

कोल्हापूर : कुशल प्रशासक कसा असतो, याची झलक जाता जाता दाखवून देणार्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सर्वच अधिकारी धास्ती घ्यायचे. दादा कधी काय बोलतील, कसा दम देतील, हे माहीत नसायचे. यामुळेच त्यांचा दौरा असला की, सर्वच अधिकारी नेहमीच अलर्ट राहायचे. अधिकार्यांना ‘दम’ देण्याचीही त्यांची आगळी स्टाईल, त्यातून काय करायचे आहे आणि कसे करायचे आहे, याचा धडाच अधिकार्यांना मिळत होता. कोल्हापूर दौर्यातही त्याचे सातत्याने प्रत्यंतर यायचे. कोल्हापूर दौर्यात त्यांचे असे अनेक किस्से आहेत. त्यातून त्यांच्यातील कुशल प्रशासकाची झलक दिसून यायची.
शिल्लक कामही अजित पवार यांच्या डोळ्यांत दिसते हां!
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी ते आले होते. दुसर्या मजल्यावर जाताना सहज त्यांची नजर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीवर गेली. तिथे उगवलेले एक झुडपे पाहून त्यांनी जिल्हाधिकार्यांना हे का काढले नाही, अशी विचारणा केली. त्यावर जिल्हाधिकार्यांनी सगळी काढली आहेत, पलीकडच्या बाजूला असल्याने एक राहिले असावे असे सांगताच अजित पवार म्हणाले, तुमचे शिल्लक कामही अजित पवार यांच्या डोळ्यांत दिसते हां! असे सांगत ही झुडपे काढण्यासाठी आणि पुन्हा येऊ नये म्हणून काय केले पाहिजे, हे सांगत त्यांनी कामाची झलक दाखवून दिली.
आता तासभर बसा अन् प्रस्ताव तयार करा, मला द्या!
सहकारी मंत्र्यांच्या मुलाच्या विवाहासाठी ते सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते. तो दौरा आटोपून ते रात्री साडे नऊच्या सुमारास कोल्हापूर शासकीय विश्रामगृहावर आले. त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व पोलिस अधीक्षकांनी त्यांचे स्वागत केले. त्यात मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुरवस्थेचा विषय निघाला आणि दादा संतप्त झाले. या विवाह समारंभातच भेटलेल्या कोल्हापूरच्या वकिलाने या इमारतीबाबत दादांना सांगितले होते. त्याचा नंबर शोधून फोन लावत तो स्पीकरवर ठेवत आताच बसा, प्रस्ताव करा, उद्या सकाळी मला द्या. मी तातडीने निधी मंजूर करतो, असे सांगितले.
धर्मशाळाही याच्यापेक्षा चांगल्या असतात का नाही!
अजितदादा एकदा सकाळी शासकीय विश्रामगृहावर नियोजित वेळेपेक्षा अगोदरच पोहोचले आणि अधिकारी, कर्मचार्यांची अडचण झाली. दादा नियोजित वेळेपेक्षा उशिरा येतील असे वाटल्याने शासकीय विश्रामगृहाच्या स्वच्छतेला काहीसा विलंब लागला. स्वच्छता सुरू होण्यापूर्वीच दादा आले आणि विश्रामगृहावरील अवस्था पाहून त्यांनी अधिकार्यांनाच धारेवर धरले. या पेक्षा धर्मशाळाही चांगल्या असतात का नाही, असा थेट सवालच त्यांनी अधिकार्यांना केला. त्यावर अवघ्या काही मिनिटांतच वेगाने स्वच्छता झाली. त्यानंतर विश्रामगृहावर स्वच्छतेकडे कधी दुर्लक्ष झाले नाही.
यापेक्षा आणखी कमी रकमेचा प्लॅन करायचा होता की!
शासकीय विश्रामगृहावर एकदा दादा अधिकार्यांची बैठक घेत होते. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत दुरुस्तीचे काय? चांगली इमारत का खराब करता, असे विचारताच तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी दुरुस्तीचा प्लॅन केल्याचे सांगितले. एखाद्या प्रश्नाची तड लावली नाही, तर ते अजित पवार कसले? त्यांनी तत्काळ कोणी प्लॅन केला आहे, त्याला बोलवा, अशी सूचना केली. काही वेळात अधिकारी आले. त्यांनी दरुस्तीचा 35-40 लाखांचा प्लॅन केल्याचे सांगितले. त्यावर कपाळावर हात मारत यापेक्षा आणखी कमी रकमेचा प्लॅन करायचा होता की, असे त्याला सांगत चांगला प्लॅन करण्याचा दम भरला. वर मी निधी देतो अशी ग्वाहीही दिली.