

कोल्हापूर : महाराष्ट्राची सांस्कृतिक चळवळ म्हणून कोल्हापूरची ओळख आहे. या चळवळीचे प्रमुख केंद्र असणारे केशवराव भोसले नाट्यगृह आगीत बेचिराख झाले आहे; पण नाट्यगृह आहे तसेच पुन्हा उभा करू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. दरम्यान, पुढचे 101 वे नाट्य संमेलन कोल्हापुरात होईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीने संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. ना. सामंत यांच्या हस्ते हा पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. शरद भुताडिया यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख 21 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमास ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी उपस्थित होते. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या जागेत व्यापारी संकुल उभारणार अशा अफवा पसरवल्या जात आहेत; पण असे काही होणार नाही. केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूरची अस्मिता आहे. यासाठी आंदोलन करावेच लागले तर मी तुमच्या सोबत असेन, असेही त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कामाचे कौतुक करत ना. सामंत म्हणाले, डॉ. भुताडिया हे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत. यापुढेही अशाच ताकदीच्या कलाकारांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करावे. कोरोना काळात अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन कोल्हापुरात होणार होते; पण तेव्हा होऊ शकले नाही. आता 101 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे कोल्हापुरातच होईल. मराठी नाट्य परिषदेच्या पदाधिकार्यांनी यासाठी ठराव करून तो पाठवावा. त्याप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाईल, असे सामंत यांनी सांगितले.
डॉ. भुताडिया म्हणाले, रसिक प्रेक्षक आजपर्यंत केलेल्या कामाचे साक्षीदार आहेत. या कामाची दखल घेऊन नाट्य परिषदेने या पुरस्काराने मला सन्मानित केले. यामुळे आपण उपकृत झालो. कार्यक्रमास नाट्य परिषद कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी, मिलिंद अष्टेकर, भाऊसाहेब भोईर व पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक गिरीश महाजन यांनी केले. सूत्रसंचालन यांनी सीमा जोशी यांनी केले.