

कोल्हापूर- आशिष शिंदे
आजऱ्याची रावी झळकणार फ्रान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये रावीच्या गुंचा लघुपटाची टूलूज फिल्म फेस्टिव्हलसाठी निवड कोल्हापूर : आशिष शिंदे आजऱ्यातील पेरणोली येथील शेतकरी कुटुंबातील रावी किशोर फ्रान्समध्ये झळकणार आहे. तिने प्रमुख भूमिका साकारलेल्या गुंचा या हिंदी लघुपटाची निवड प्रतिष्ठित टूलूज इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी झाली आहे. रावीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मोठ्या पडद्यावर वेगळी ओळख निर्माण केली असून, तिच्या अभिनयाच्या प्रवासात हा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. २३ ते २७ एप्रिल २०२५ दरम्यान फ्रान्समध्ये होणाऱ्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाचा प्रीमियर होईल. रावी किशोर ऊर्फ स्वाती देसाई ही गेल्या काही वर्षांपासून केरळमध्ये स्थायिक आहे.
मल्याळम, तेलुगू, कोंकणी, तमिळ, हिंदी भाषेतील सिनेमा, वेब सीरिज आणि नाटकांत तिने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (इफ्फी), न्यूयॉर्क, ऑस्ट्रेलिया, युरोप येथे झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या विविध भाषेतील लघुपट आणि सिनेमांची निवड झाली आहे. रावी किशोर हिने यापूर्वी कुपांचो दर्यो, अर्धी दीस, घरटं आदी आंतरराष्ट्रीय स्तरावर कोंकणी लघुपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. उदरनिर्वाहासाठी घरापासून दूर राहून घरच्यांची काळजी करणाऱ्या सर्वसामान्य महिलांची गोष्ट या लघुपटातून आम्ही समोर आणली आहे. टूलूजसाठी गुंचा या लघुपटाची निवड होणे ही आमच्या मेहनतीची पोचपावती आहे. - रावी किशोर, अभिनेत्री