

कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदासाठी भाजपकडून अजितसिंह मोहिते, ॲड. दत्तात्रय राणे यांचे, तर काँग्रेसकडून दत्ताजीराव वारके यांचे नाव नेत्यांकडून देण्यात आले आहे. अध्यक्ष निवडीबाबत मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे यांनी इच्छुकांची माहिती घेतली. उपाध्यक्षपदासाठी आमदार चंद्रदीप नरके गटाचे परशुराम कांबळे हे एकमेव नाव आले आहे.
शेतकरी संघ नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड मंगळवारी होत आहे. आता भाजप किंवा काँग्रेसला अध्यक्षपद मिळणार आहे. अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी जिल्हा बँकेत रविवारी नेते व संचालकांची बैठक झाली. बैठकीला मंत्री हसन मुश्रीफ, आमदार विनय कोरे, माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. जयंत पाटील, ‘गोकुळ’चे माजी संचालक युवराज पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये नेत्यांनी इच्छुकांची नावे जाणून घेतली. मात्र, आ. सतेज पाटील, आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके उपस्थित नसल्याने अध्यक्षपद कोणत्या पक्षाला द्यायचे याचा निर्णय होऊ शकला नाही. नेत्यांशी चर्चा करून आज सोमवारी (दि. ८) अध्यक्षपदाचे नाव निश्चित केले जाणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
उपाध्यक्षपदी कांबळे निश्चित
उपाध्यक्षपदासाठी आ. नरके गटाचे कांबळे यांचे एकमेव नाव आले आहे. अन्य कोणीही इच्छुक नसल्याने परशुराम कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
बनकर यांचा पत्ता कट
काँग्रेसचे संचालक आनंदा बनकर हे मागील वेळीही अध्यक्ष पदासाठी इच्छुक होते; पण त्यावेळी अध्यक्षपद जनसुराज्य शक्ती पक्षाकडे गेले. आताही काँग्रेसकडून बनकर व वारके यांचे नाव चर्चेत होते; पण काँग्रेसकडून वारके यांचे एकमेव नाव आल्याने बनकर यांचा अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा पत्ता कट झाला आहे.