

कोल्हापूर : उमेदवारांची निवड, प्रतिकूल परिस्थितीतही प्रचारात घेतलेली आघाडी, कार्यकर्त्यांचा राबता, पदाधिकार्यांची साथ, संघटनात्मक बांधणी आणि अजित पवार यांचा विमान अपघातात झालेल्या अकाली मृत्यूमुळे मिळालेली सहानुभूती, यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीला यश मिळाले. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या दीर्घ राजकीय अनुभव व मुत्सद्देगिरीचा करिष्मा या निवडणुकीत दिसून आला.
कोल्हापूर जिल्हा एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. बदलत्या राजकीय समीकरणांमुळे सध्या हसन मुश्रीफ हे पक्षाचे एकमेव आमदार आहेत. असे असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी आपले वर्चस्व ठेवून आहे. विशेषतः, ग्रामीण भागातील विकासकामे, सहकार क्षेत्राशी असलेले मुश्रीफ यांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि कार्यकर्त्यांशी सततचा संपर्क याचा फायदा राष्ट्रवादीला या निवडणुकीत झाला.
जागावाटपात एकमत होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर मुश्रीफ यांनी आपल्या राजकीय अनुभवाचा कस लावत स्थानिक पातळीवर आघाड्या करण्यास सुरुवात केली. सुरुवातच त्यांनी आपल्या होमपिच कागलमधून केली. येथे शिवसेनेला लांब ठेवून भाजपसोबत आघाडी करत सर्व जागा जिंकल्या. गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालुक्यांत काही ठिकाणी तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबरोबर आघाडी केली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते आमदार विनय कोरे व मंत्री हसन मुश्रीफ यांची दोस्ती सर्वांना माहिती आहे. परंतु, यावेळी त्यांना त्यांच्या मतदारसंघात जाऊन आव्हान देत काही जागा निवडून आणल्या आहेत.
पक्षाचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे पक्षाला काही दिवस प्रचार थांबवावा लागला होता. नेत्यांवर कार्यकर्त्याची किती श्रद्धा असते, हे गडहिंग्लज येथील कार्यक्रमात नागरिकांनी पाहिले. या कार्यक्रमात मुश्रीफ यांना हुंदका आवरत नव्हता. यातून निर्माण झालेली सहानुभूती आणि मुश्रीफ यांच्या कामाचा करिष्मा, यामुळेच मिनी मंत्रालयामध्ये राष्ट्रवादीला पुन्हा एकदा घवघवीत यश मिळाले आहे.