कोल्हापूर/गारगोटी : राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना अशी महायुती असली, तरी सर्वांना पक्ष वाढविण्याची मुभा आहे. येत्या काही महिन्यांत निवडणुका होणार आहेत. पक्षवाढीसाठी हीच संधी आहे. पक्षाचे सदस्य वाढविण्याबरोबरच माणसं जोडून स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवा. कोल्हापूर महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता आणा. महापौरांसह नगराध्यक्ष, सभापती हे राष्ट्रवादीचे करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दरम्यान, महायुतीचे सरकार हे शेती डोळ्यांसमोर ठेवून बळीराजाला मदत करणारे शेतकरी हिताचे असल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले.
माजी आमदार के. पी. पाटील यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत पुनर्प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर मुदाळ (ता. भुदरगड) येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात पवार बोलत होते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ प्रमुख उपस्थित होते. 1999 पासून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून के. पी. पाटील म्हणजे पक्षाशी जोडलेला व कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाची खडान्खडा माहिती असलेला कार्यकर्ता आहे. ‘सुबह का भुला... शाम को घर आया...’ यामुळे आपल्याला आनंद झाला. के. पी. यांना पूर्वीसारखाचा मानसन्मान आणि जबाबदारी दिली जाईल. मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात राष्ट्रवादी बळकट करावी. नेते एक असतील, तर कार्यकर्त्यांना बळ मिळेल. पर्यायाने त्यांचा विश्वास वाढून पक्षही वाढेल, असेही अजित पवार म्हणाले.
भोगावती, कुंभी-कासारी, सदाशिवराव मंडलिक हमीदवाडा, गडहिंग्लज व आजरा या साखर कारखान्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. आर्थिक नियोजन नसल्याने कर्मचार्यांना पगार मिळत नाहीत. शेतकर्यांना भाव दिला जात नाही; मात्र इतरत्र तेच शेतकरी ऊस पिकवतात. जमिनीचा पोत तोच आणि पाणीही तेच आहे; मात्र राष्ट्रवादीच्या नेत्यांचे नेतृत्व चांगले असून इतर कारखाने चांगले चालत आहेत. यामध्ये के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘बिद्री’ तर मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली संताजी घोरपडे कारखाना सुयोग्य आर्थिक नियोजनामुळे उत्कृष्ट चालत असल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.
महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांत कार्यकर्ते हाडाची काडं करून आणि रक्ताचं पाणी करून राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करतील. के. पी. पाटील यांच्या प्रवेशामुळे दोन-तीन तालुक्यांत राष्ट्रवादीची ताकद वाढून हत्तीचं बळ मिळाले आहे. के. पी. यांच्या रूपाने मला मोठा भाऊ परत मिळाला आहे. के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यामुळेच मी जिल्ह्याचा नेता आहे; परंतु त्या दोघांत काय फाटलयं कळत नाही. या दोघांतील भांडणे मिटली पाहिजेत. त्यांच्यातील युद्धाचे ऑपरेशन केले पाहिजे. दोघांनाही पक्षातून बाहेर सोडणार नाही, असे सांगून मुश्रीफ म्हणाले, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती म्हणून आम्ही सामोरे जाणार आहोत; परंतु ज्या ठिकाणी एकत्र जमत नसेल तेथे स्वतंत्रपणे मैदानात उतरू, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
के. पी. पाटील म्हणाले, मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सहकाराचे चांगले संघटन सुरू आहे. ‘बिद्री’च्या माध्यमातून आपण सहवीज इथेनॉल प्रकल्प उभारला. सूतगिरणीचा कारभार चांगला ठेवल्याचे सांगितले.
गोकुळचे संचालक रणजितसिंह पाटील यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, ‘बिद्री’चे उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक धनाजीराव देसाई, राजेंद्र पाटील, धैर्यशील पाटील, पंडितराव केणे, उमेश भोईटे, मधुकर देसाई, विनय पाटील, एकनाथ पाटील, संग्राम देसाई, राजेंद्र देसाई आदी उपस्थित होते. किसन चौगले यांनी स्वागत केले. प्रकाश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.
काळम्मावाडी धरणाच्या गळतीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले होते. त्यासाठी 80 कोटींची मागणीही केली होती. त्याविषयी चर्चा करून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न केला. अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून गळती काढण्याचे काम सुरू केले. आतापर्यंत 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पुढील वर्षापर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर सुमारे पाच टीएमटी गळतीतून वाहणारे पाणी शेतकर्यांना मिळेल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
के. पी. पाटील व ए. वाय. पाटील या मेहुणे-पावणे आणि त्यांच्यातील भावकी, गटातटाच्या राजकारणाचा अजित पवार यांनी चांगलाच समाचार घेतला. तुमच्यातील भांडण मिटवा. या भांडणामुळेच तुमच्या अनेक संधी गेल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रयत्न केले. मुश्रीफ यांनी मध्यस्थी केली. मीसुद्धा अनेकवेळा सांगितले; पण हे दोघे एकत्र येत नाहीत. त्याचा इतरांना फायदा झाला. शेवटी बेरजेचे राजकारण करावे लागते. के. पी. यांनी कितीही मशाली पेटविल्या, तरी त्यांच्या हातात घड्याळ आणि हृदयात राष्ट्रवादी आहे, असेही पवार म्हणाले.
राजकारण जरून करावे; मात्र विकासकामात कोणतीही अडचण आणू नये. तसे कोण करत असेल, तर तो माझ्या विचाराचा नाही. कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पास परवानगी द्यायचे माझ्या हातात आहे. मुश्रीफ, छगन भुजबळ मंत्री झाले; पण कार्यकर्त्यांनी काय करायचे? नेतृत्व तयार झाले पाहिजे. लोकसभा, विधानसभेला काय करायचे ते करू; मात्र तोंडावर आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या कामाला लागा, असेही पवार यांनी सांगितले.