अजितदादांचे महाविद्यालयीन दिवस आजही आठवतात

दादांच्या मामेबहीण अंजली भोसले भावुक; आठवणींनी डोळे पाणावले
कोल्हापूर : कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या मामेबहीण अंजली भोसले यांच्यासमवेत अजित पवार.
कोल्हापूर : कोल्हापुरात वास्तव्यास असलेल्या मामेबहीण अंजली भोसले यांच्यासमवेत अजित पवार.
Published on
Updated on

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात जशी पोकळी निर्माण झाली आहे, तसाच त्यांच्या कोल्हापुरातील आठवणींच्या कप्प्यातील एक हळवा कोपरा आज कायमचा रिता झाला आहे. अजितच्या मृत्यूची दुर्दैवी बातमी कानावर आली आणि अजितदादा शिक्षणासाठी कोल्हापुरात राहत असतानाच्या काळातील ते दिवस आठवले, अशा शब्दांत अजितदादांच्या सहवासातील क्षण आणि अनेक हृद्य आठवणींना कोल्हापूरस्थित त्यांच्या मामेबहीण अंजली जगदीश भोसले यांनी उजाळा दिला. अजितदादा आणि अंजलीताई हे आते-मामे भावंडं असल्यामुळे दोघांच्या लहानपणीच्या आठवणी, गप्पा आणि चेष्टा-मस्करीला उधाण यायचं. अजित पवार यांच्या निधनानंतर अंजलीताईंचे डोळे अजितदादांच्या विद्यार्थीदशेतील आठवणींनी पाणावले.

अजित पवार यांनी 1976 च्या सुमारास बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात कॉमर्स शाखेतून पदवीचे शिक्षण सुरू केले. ती दोन वर्षे त्यांच्या आयुष्यातील केवळ विद्यार्थी जीवन नव्हे, तर पुढील आयुष्याला दिशा देणारी जडणघडण ठरली. ‘अजितने जरी वसतिगृहात प्रवेश घेतला असला, तरी तो राहायला माझ्याच घरी होता’ असं सांगताना अंजलीताई आजही भावुक होतात. अगदी पट्टीचा खवय्या असल्यामुळे अजित घरी आला की, कोल्हापुरी मटण, तांबडा-पांढरा रश्श्याचा बेत ठरलेलाच असायचा. ताराबाई पार्कमधील आमच्या भोसले कुटुंबीयांच्या मनात अजितच्या विद्यार्थी वयातील असंख्य आठवणी आजही जिवंत आहेत.

अजितचा रोखठोक स्वभाव असूनही माणसं जोडण्याची विलक्षण कला त्याच्याकडे होती. मोठा मित्रपरिवार, हजरजबाबीपणा आणि संघटन कौशल्य हे गुण त्याच्यात तेव्हापासूनच ठळकपणे दिसून येत होते. कोल्हापुरातील अवघ्या दोन वर्षांत त्याने अनेक माणसं आपलीशी केली होती. त्याच्या आजूबाजूला कायम मित्रांचा गराडा असायचा, हे त्याचं खास वैशिष्ट्य होतं, असं सांगताना अंजलीताई 50 वर्षे मागे गेल्या.

कोल्हापुरात शिक्षण सुरू असतानाच अजित पवार यांच्या आयुष्यात मोठा आघात झाला. वडील अनंतराव पवार यांचे निधन झाले. त्यामुळे अजितदादांना शिक्षण अर्धवट सोडून बारामतीला परतावे लागले. तिथूनच सहकार, सामाजिक कार्य आणि पुढे राजकारणात त्यांच्या आयुष्याची घोडदौड सुरू झाली. राजकारणातील प्रचंड व्यस्ततेनंतरही कोल्हापूरशी असलेले नाते अजित पवार यांनी कधीच तोडले नाही. जेव्हा जेव्हा ते राजकीय सभा, दौरे किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने कोल्हापूरला यायचे, तेव्हा वेळात वेळ काढून अंजलीताई आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घ्यायचे. घरचं जेवण, आपुलकीची चौकशी आणि नात्यांची ऊब त्यांनी शेवटपर्यंत जपली. अंजलीताईंचे चिरंजीव शैलेश, सून अनुराधा, नातवंडं यांच्याबरोबर अजितदादांची नेहमीच गप्पांची मैफल रंगायची. आज अजित पवार आपल्यात नसले, तरी ताराबाई पार्कमधील त्यांच्या मामेबहीण अंजलीताई यांचं ते घर, कॉलेजचे दिवस, मित्रांचा गराडा, लॅम्ब्रेडाची सफर हे सगळं आजही तितकंच जिवंत आहे.

अजितदादा आणि लॅम्ब्रेडा

अजित पवार यांना तरुणपणापासूनच विंटेज गाड्यांची विशेष आवड होती. गाड्यांचा इतिहास, त्यांची रचना आणि त्या काळातील प्रवास संस्कृती याबद्दल त्यांना विलक्षण कुतूहल होते. अंजलीताईंच्या घरी असलेल्या काही जुन्या गाड्यांची त्यांनी तरुणपणी सफर केली होती. भोसले कुटुंबीयांची लॅम्ब्रेडा दुचाकी अजित पवार यांनी कोल्हापुरातील वास्तव्याच्या काळात वापरली होती. कॉलेज, मित्रभेटी आणि शहरातील फेरफटक्यासाठी ही दुचाकी अनेकदा त्यांची सोबती ठरली, अशीही आठवण अंजलीताई यांनी अगदी आवर्जून सांगितली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news