AI Flood Alerts | आता ‘एआय’ देणार महापुराचे अलर्ट!

अतिवृष्टीपूर्वीच वातावरणातील संकेतांद्वारे मशिन लर्निंग देईल महापुराची माहिती
AI Flood Alerts
AI Flood Alerts | आता ‘एआय’ देणार महापुराचे अलर्ट!
Published on
Updated on

आशिष शिंदे

कोल्हापूर : कोल्हापुरात अचानक धो धो पाऊस सुरू होतो आणि बघता बघता नद्या दुथडी भरून वाहू लागतात. यंत्रणा सतर्क होण्याआधीच पंचगंगेची पाणीपातळी इशारा आणि धोका पातळी ओलांडते. अतिवृष्टीचे पाणी नदीपात्रात वेगाने येते आणि कोल्हापूरला पुराचा विळखा पडतो. आतापर्यंत नदीची पाणीपातळी वाढल्यानंतरच पुराचा धोका स्पष्ट होतो. मात्र, नदीत पाणी वाढण्याच्या काही काळ आधीच वातावरणात या संकटाची चाहूल देणारे बदल सुरू झालेले असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय हे बदल ओळखून महापुराचा धोका आधीच सांगू शकते. अत्याधुनिक प्रणालींच्या आधारे शिवाजी विद्यापीठासह पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेतील संशोधकांनी आधीच महापुराची चाहूल देणारे एआय मॉ़डेल विकसित केले आहे.

कोल्हापुरातील २०१९ आणि २०२१ च्या महापुरांचा आधारे संशोधकांनी वातावरणातील उष्णता, आर्द्रता, ढगांची निर्मिती, वाऱ्याची स्थिती आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांची माहिती गोळा केली. विशेषतः सीएपीई आणि ओएलआर या वातावरणीय निर्देशांकांचा वापर करण्यात आला. सीएपीई निर्देशांकातून वातावरणातील जोरदार पाऊस निर्माण करण्याऱ्या ऊर्जेची माहिती मिळाली. तर ओएलआरमधून वातावरणात दाट व उंच पावसाचे ढग किती सक्रिय आहेत, याची स्थिती उपलब्ध झाली. पर्जन्यमानासोबत तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, या घटकांमध्ये होणारे बदल आणि प्रत्यक्ष पडणारा पाऊस यांच्यातील संबंध मशिन लर्निंगद्वारे शोधून महापुराच्या आधी वातावरणात दिसणारे संकेत शोधण्यात आले आहेत.

२०१९ आणि २०२१ च्या महापुराची कारणे होती वेगवेगळी कोल्हापुरात आलेल्या २०१९ आणि २०२१च्या महापुरांची कारणे वेगवेगळी असल्याचेही समोर आले आहे. २०१९ मध्ये सीएपीईचे प्रमाण जास्त आणि ओएलआर कमी होता. यामुळे दीर्घकाळ ढगांची निर्मिती व पावसाचे वातावरण राहिले. तर २०२१ मध्ये पुराच्या आधी सीएपीईमध्ये अचानक वाढ आणि ओएलआर मध्ये झपाट्याने घट झाली. म्हणजेच वातावरण अचानक अतिवृष्टीसाठी अनुकूल झाले आणि कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात पडला व फ्लॅश फ्लड परिस्थिती निर्माण झाली होती.

डॉ. रुपेश घोडपागे, एम. एफ. रडार, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

हे इंडिकेटर्स व मशिन लर्निंग सांगेल महापुराचा अंदाज सीएपीई म्हणजे कन्व्हेक्टिव्ह अव्हेलेबल पोटेन्शिअल एनर्जी तर ओएलआर म्हणजे आऊटगोईंग लाँगवेव्ह रेडिएशन. सीएपीई वातावरणात जोरदार पाऊस निर्माण करण्यासाठी उपलब्ध असलेली ऊर्जा, तर ओएलआर पृथ्वीवरून अवकाशात जाणाऱ्या उष्णतेचे प्रमाण सांगते. सीएपीई वाढणे आणि ओएलआर कमी होणे म्हणजे वातावरण अतिवृष्टीसाठी अधिक अनुकूल होत असल्याचे संकेत मानले जातात. मशीन लर्निंग मॉडेल त्यांचा डेटा वापरून पावसाचा अंदाज घेते.
डॉ. रोहित पाटील, संशोधक, आयआयटीएम, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news