Minister Uday Samant | ‘एआय’मुळे हजारो नोकर्‍या मिळणार

मंत्री उदय सामंत; शिवाजी विद्यापीठात नोकरी महामेळाव्याला प्रचंड प्रतिसाद
Minister Uday Samant
कोल्हापूर : राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत. समवेत डॉ. सुभाष कोंबडे, प्रा. एन. डी. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, डॉ. ज्ञानेश्वर मुळे, खा. धैर्यशील माने, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे. (छाया : पप्पू अत्तार)
Published on
Updated on

कोल्हापूर : युवकांना रोजगार संधींची आवश्यकता आहेच; पण त्यांना रोजगार देत असताना रोजगारदात्यांनी किमान वेतनाची हमी देणे आवश्यक आहे. येणार्‍या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे हजारो नोकर्‍या मिळणार आहेत, हे विद्यार्थांना पटवून दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

शिवाजी विद्यापीठ मध्यवर्ती रोजगार कक्ष, डॉ. ज्ञानेश्वर मुळे फाऊंडेशन आणि विद्यापीठ विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय नोकरी महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव होत्या. मंत्री सामंत म्हणाले, रोजगार मेळाव्यांमध्ये निवडलेल्या उमेदवारांना उद्योग किमान वेतन देतात का, याची खातरजमा करावी, यासाठी विद्यापीठाने या कंपन्यांच्या मनुष्यबळ अधिकार्‍यांसमवेत महिन्याला बैठक घेऊन सूचना द्याव्यात.

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लघुचित्रफितीद्वारे संदेश पाठविला. शिवाजी विद्यापीठाने नोकरी मेळाव्याचे आयोजन केल्याने स्थानिक युवकांना निश्चितपणे लाभ होईल, असा विश्वास व्यक्त केला. खा. धैर्यशील माने म्हणाले, कौशल्याधिष्ठित मनुष्यबळ विकसित करण्यासाठी उद्योग विभाग प्रयत्न करीत आहे. याचा युवकांनी लाभ घेतला पाहिजे. डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, देशात 10 कोटी बेरोजगार आहेत. त्याचप्रमाणे कोट्यवधी रोजगार उपलब्ध आहेत. या दोहोंची सांगड घालत गुणवान युवा पिढीला रोजगार देण्यासाठी मेळावा घेतला आहे. विद्यापीठ विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, युवा पिढीने रोजगारांसाठी आवश्यक विविध जीवनकौशल्ये आत्मसात करावीत.

अध्यक्षीय मनोगतात प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, रोजगार महामेळाव्याला उमेदवारांचा लाभलेला प्रतिसाद लक्षणीय स्वरुपाचा आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रोजगाराभिमुख पात्र उमेदवारांना आवश्यक कौशल्ये प्रदान करण्याच्या द़ृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहील. मध्यवर्ती रोजगार कक्षाचे समन्वयक डॉ. सुभाष कोंबडे यांनी प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, स्वागत परुळेकर, संजय परमणे, जी. बी. दीक्षित आदी उपस्थित होते.

9000 जागांसाठी 17000 उमेदवार

महामेळाव्यामध्ये 9 हजार जागा होत्या. आठवीपासून ते पीएच.डी.पर्यंतचे 17 हजार उमेदवार उपस्थित होते. यात मुलींची संख्या लक्षणीय होती. ऑनलाईन पद्धतीने 6 हजार उमेदवारांनी नोंदणी केल्याची माहिती डॉ. सुभाष कोंबडे यांनी दिली.

दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड

कोल्हापूर, सांगली व सातारासह पुणे, कर्नाटक, गोवा या ठिकाणांहून विद्यार्थी आले होते. मेळाव्यासाठी विविध ठिकाणी मुलाखती घेण्यात आल्या. यातून सुमारे 2 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news