

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात यावर्षीही गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाचे नियोजन सुरू झाले असून याबाबतचे गुरुवारी सादरीकरण होणार आहे. यासह दसरा महोत्सवात दर्जेदार कार्यक्रम असतील, यादृष्टीने यावर्षी नियोजन केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.
अंबाबाईचा नवरात्रौत्सव आता अवघ्या अकरा दिवसांवर आला आहे. सध्या अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यात मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासह गरूड मंडप, मणिकर्णिका कुंड आदींचीही कामे सुरू आहेत. ही कामे नवरात्रौत्सवापूर्वी पूर्ण करण्याबरोबरच या कामांमुळे गर्दीवर होणाऱ्या परिणामावर उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
गतवर्षी प्रथमच गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला होता. यावर्षीही याच तंत्रज्ञानाचा आणखी प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत चर्चा सुरू आहे. त्यादृष्टीने गुरुवारी (दि.१) त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयात सादरीकरण होणार आहे. यानंतर सोमवार, दि.५ रोजी नवरात्रौत्सव नियोजनाची सर्व विभागांची व्यापक बैठक होणार आहे.
यंदाच्या दसरा महोत्सवात दर्जेदार कार्यक्रम
यंदाच्या दसरा महोत्सवात अधिक दर्जेदार कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रशासनाचा विचार आहे, त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी सांगितले. कोल्हापूर शहर, जिल्ह्यातील नागरिकांसह अन्य जिल्ह्यातून, राज्यातून येणारे भाविक, पर्यटक या कार्यक्रमाचा आस्वाद घेतील असे कार्यक्रम आयोजित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचेही त्यांनी सांगितले.
जि.प.ची रविवार, सोमवार १,०२६ गावांत मोहीम : डॉ. जॅसमीन
घटस्थापनेच्या पूर्वी घराघरांत स्वच्छता मोहीम राबविली जाते. त्यातून निर्माण होणारा कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर, मोकळ्या जागेत टाकून दिला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने यावर्षीही रविवार, दि.४ व सोमवार, दि.५ रोजी १,०२६ गावांत टाकाऊ वस्तू संकलनाची मोहीम आयोजित केली आहे. या मोहिमेअंतर्गत वापरून झालेले टाकाऊ कपडे, प्लास्टिक, भंगारचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक आदी वस्तूंची खरेदीदार निश्चित केले आहेत. त्यातून ग्रामपंचायतींना उत्पन्नही मिळणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमीन यांनी सांगितले.