kolhapur | एआय आता गुणगुणणार लोकबोलींची ‘ओवी’

kolhapur | एआय आता गुणगुणणार लोकबोलींची ‘ओवी’
kolhapur | एआय आता गुणगुणणार लोकबोलींची ‘ओवी’
Published on
Updated on

तानाजी खोत

कोल्हापूर : आईच्या ओठावरची ओवी, पहाटेच्या वेळी जात्यासोबत हवेत घुमणारा तो सूर, बदलत्या काळात हे सगळं हरवून जातंय की काय, अशी भीती वाटत असतानाच आता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ मदतीला धावून आले आहे. ज्ञानाच्या या अथांग महासागरात आपली मायबोली आणि तिचे विविध लहेजे बुडू नयेत, यासाठी महाराष्ट्राच्या नव्या एआय धोरणात विशेष मोहीम आखण्यात आली आहे.

आता एआय केवळ इंग्रजी किंवा प्रमाण मराठीत बोलणार नाही, तर ते कोल्हापुरी बोलीत देखील ‘काय भावा, काय करायलायस?’ किंवा अहिराणीत ‘काय पावनं, कशा शेत?’ असा प्रतिसाद देणार आहे. तंत्रज्ञान आणि संस्कृतीचा हा अनोखा संगम भाषिक वैविध्य जतन करणारा मोठा प्रयोग ठरणार आहे. तांडा असो, पाडा असो वा कोळीवाडा, तिथली भाषा एआयच्या संवादाची भाषा होणार आहे. ‘चाल ना पावनं, जेवणाना टाइम व्हय गया, हात-पाय धुई ल्या!’ अशा रोजच्या जीवनातील संवादाला देखील एआय समजून उत्तर देऊ शकेल.

कोल्हापुरी ठसका ते मालवणी गोडवा

या तंत्रज्ञानात ‘अ‍ॅडव्हान्स्ड ऑडिओ पॅटर्न रिकग्निशन’. समजा, एखादा कोल्हापुरी गडी ‘जेवलास का न्हाई? का नुसतंच हिंडायलयस?’ असं विचारतो तेव्हा एआयला त्यातील शब्दांपेक्षा त्या ‘स्वराघातावरून’ समजेल की, हा संवाद कोल्हापुरी आहे. मालवणीत कोणी ‘तो काय ऐकतालो नाय, उगीच कशाक गजाली मारतास?’ असं विचारलं, तर एआय तो ठसका ओळखून त्याच भाषेत उत्तर देईल. यात कोळी बांधवांचे समुद्रविषयक ज्ञान भांडार असेल, पारंपरिक गीतं असतील. यातील भाषिक गोडवा आता एआय टिपेल. आदिवासींच्या लिपी नसलेल्या भाषेलाही यामध्ये आवाजाच्या पॅटर्नवरून कोडिंग केले जाईल.

मग तुम्हीही व्हा ‘भाषादूत’!

‘भाषादान’ या क्राऊड सोर्सिंग उपक्रमात सहभागी होऊन तुम्ही तुमच्या बोलीतील ओव्या, म्हणी किंवा साधे संवाद रेकॉर्ड करू शकता. तुमचे हे छोटेसे योगदान एआय तंत्रज्ञानाला आपल्या बोलीचा ‘हेल’ आणि ‘लहेजा’ शिकवण्यासाठी मोलाचे ठरेल. ‘भाषिणी’ अ‍ॅप किंवा पोर्टलला भेट देऊन आपले ‘भाषादान’ करू शकता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news