AI Brain Laziness | सावधान...‘एआय’ युगात मेंदू बनतोय आळशी!

AI Brain Laziness |
AI Brain Laziness | सावधान...‘एआय’ युगात मेंदू बनतोय आळशी!
Published on
Updated on

कोल्हापूर : हातातील स्मार्टफोन, टेबलवरील लॅपटॉपने जग जवळ आणले पण मेंदूला आळशी तर बनवले नाही ना? प्रत्येक गोष्टीच्या शोधासाठी इंटरनेटचा वापर, रील्समध्ये तासनतास रमण्याची सवय, वाढता स्क्रीनटाईम यामुळे स्मरणशक्ती, एकाग्रता आणि विचारक्षमतेवर परिणाम करत असल्याचे चित्र चिंताजनक आहे. डिजिटलनंतरच्या ‘एआय’(कृत्रिम बुद्धिमत्ता) युगात मेंदू आळशी बनवणाऱ्या या ब्रेन रोट विकाराच्या विळख्याने विद्यार्थी, युवक, महिला, ज्येष्ठांनाही जखडले आहे. मेंदूचा जितका वापर होतो तितका तो अधिक सक्रिय राहतो. मात्र, प्रत्येक गोष्टीसाठी मोबाईलवर अवलंबून राहिल्यास स्मरणशक्तीचा वापर कमी होतो. शिक्षण, नोकरी, व्यवसाय, बँकिंग, मनोरंजन आणि संवाद यासाठी स्मार्टफोनचा वापर झपाट्याने वाढल्याने स्क्रीनसमोर घालवला जाणारा वेळही वाढत आहे.

तुमच्यातही आहेत का ‘ही’ लक्षणे?

कुटुंबीय, मित्रांचे फोननंबर, बँक तपशील, महत्त्वाच्या नोंदींचे विस्मरण

प्रत्येक प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी इंटरनेट वापराकडे कल

पाच-दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ मन एकाग्र होत नाही.

पुस्तक किंवा मोठा लेख वाचताना कंटाळा येतो.

प्रत्यक्ष संवादापेक्षा मोबाईल अधिक सोयीचा वाटतो.

कोणत्या वयोगटात अधिक धोका?

८ ते १५ वर्षे : अभ्यासातील एकाग्रता कमी होण्याची शक्यता

१६ ते २५ वर्षे : रील्स आणि सोशल मीडियामुळे एकाग्रता कमी होण्याचा धोका

२६ ते ४५ वर्षे : काम आणि स्क्रीनच्या दुहेरी ताणामुळे मानसिक थकवा

४५ वर्षांवरील : स्मरणशक्तीचा कमी वापर, डिजिटल साधनांवरील वाढते अवलंबित्व

‘ब्रेन रॉट’ म्हणजे काय?

ब्रेन रॉट हा आजार नाही तर कमतरता आहे. डिजिटल तंत्राच्या वाढत्या वापरामुळे माहिती मेंदूत साठवण्यापेक्षा प्रत्येक माहितीकरिता इंटरनेट, एआय तंत्र यावर अवलंबून राहण्याची सवय यामुळे सखोल विचार करण्याची क्रिया, तर्क लावण्याची बौद्धिक क्षमता बोथट होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news