

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील पूर नियंत्रण आता ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने केले जाणार आहे. या तंत्रज्ञानावर आधारित जिल्हा प्रशासनाच्या ‘अर्ली वॉर्निंग सिस्टीम’ (आगाऊ इशारा) प्रकल्पाला राज्य शासनाच्या तांत्रिक समितीने मंजुरी दिली आहे. उर्वरित प्रक्रियाही येत्या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होतील, असे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
जिल्ह्यात दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असते. कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरासह जिल्ह्यातील 129 गावी पूरप्रवण क्षेत्रात आहेत. दरवर्षी पूर येत असतोच. त्यात जिल्ह्यात 2005, 200 6, 2019 व 2021 मध्ये महापूर आला होता. जिल्ह्याला दरवर्षी पुराचा धोका असल्याने पूर नियंत्रणासाठी आता या तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्हा प्रशासनाने आगाऊ इशारा देणारी यंत्रणा विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुमारे 35 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला राज्याच्या तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. आता हा प्रकल्प मान्यतेसाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या राज्य कार्यकारी समिती समोर जाईल. या समितीच्या मान्यतेनंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासमोर अंतिम मंजुरीसाठी हा प्रकल्प जाईल. ही सर्व प्रक्रिया येत्या दोन ते तीन महिन्यांत पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.
48 ठिकाणी रडार यंत्रणा
या प्रकल्पांतर्गत 48 ठिकाणी रडार यंत्रणा उभारली जाईल. या यंत्रणेद्वारे रिअल टाईम डेटा, लेवल मिळेल. पुढील 24 तास, 48 तास परिस्थिती कशी असेल, पाणी पातळी कुठे आणि किती वाढेल याची माहिती मिळेल. त्याद्वारे पूरस्थिती नियंत्रण आणि आवश्यक उपाययोजना आगाऊ करणे शक्य होणार आहे.
राज्यातील पहिलाच प्रकल्प
‘एआय’ तंत्रज्ञानाचा मदतीने पूर नियंत्रणाचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे. आपत्ती व्यवस्थापनात कोल्हापूर आघाडीवर आहे. विविध उपक्रम, नवनवीन प्रकल्प कोल्हापुराने सुरू केले आहेत. त्यात या प्रकल्पाची भर पडणार आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता सी-डॅकची मदत घेतली आहे. गतवर्षी सी-डॅककडून हवामानाच्या अंदाजासह विविध माहिती (डेटा) प्रशासनाला दिली होती. त्याचा प्रशासनाला फायदा झाला. यापुढे जिल्ह्यातील भागनिहाय, गावनिहाय तसेच शहरातील वॉर्डनिहाय हवामानांचा अंदाज, त्यानंतरच्या परिस्थितीचा सर्व डेटा उपलब्ध होणार आहे.