

कोल्हापूर : अपर्णा महाडिक यांच्या पतीच्या मावशी कोल्हापूरच्या. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचे कोल्हापुरात येणे-जाणे. त्याही कोल्हापुरात तीन वर्षांपूर्वी येऊन गेल्या होत्या. दहाच दिवसांपूर्वी सर्व नातेवाईकांचे लोणावळा येथे गेटटूगेदर झाले, त्यावेळी सप्टेंबर महिन्यात मी येणार आहे, आई अंबाबाईचे दर्शन घ्यायचे आहे, असे त्यांनी सांगितले होते; मात्र आई अंबाबाईच्या दर्शनाची त्यांची आस अधुरीच राहिली.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या, विमानाच्या वरिष्ठ क्रू मेंबर अपर्णा या कोल्हापुरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त अधिकारी रवींद्र पंदारे यांच्या मेहुणीच्या सून. यामुळे अपर्णा यांचेही कोल्हापुरातील पंदारे यांच्या घरी येणे जाणे होते. तीनच वर्षांपूर्वी त्या कोल्हापुरात आल्या होत्या. दोन दिवस त्या कोल्हापुरात होत्या. मनमोकळ्या स्वभावामुळे त्या नातेवाईकांत चांगल्या रमायच्या. सोशल मिडीयांच्या माध्यमातून त्या कोल्हापूरच्या नातेवाईकांच्याच संपर्कांत असायच्या.
दहाच दिवसापूर्वी कौटुंबिक स्नेहमेळाव्यात पंदारे कुटूंबियांतील सदस्य आणि अपर्णा एकत्र होत्या. त्यावेळी अपर्णा यांनी कोल्हापूरला येऊन खूप दिवस झाले, मला अंबाबाईच्या दर्शनाला यायचेच आहे. सप्टेंबर महिन्यात येऊन जातो, असेही त्यांनी सांगितले होते. आज दुपारी ही दुख:द घटना कळाली आणि आम्ही तडक मुंबईच्या दिशेने निघोला आहोत असे पंदारे यांनी सांगितले.
लोणावळा येथे दहा दिवसांपूर्वी झालेल्या स्नेहमेळाव्यानंतर पुढील गेटटूगेदर पन्हाळ्यावर करण्याचे नियोजन कुटुंबीयांचे सुरू होते. पन्हाळ्याच्या गेटटूगेदरला येऊ, त्याबरोबर कोल्हापूरलाही येऊ. अंबाबाईचे दर्शनही घ्यायचे असे सांगतानाच अपर्णा यांनी वेळ काढून येऊन जातोच, असे सांगितले होते.