

चंद्रशेखर माताडे, कोल्हापूर
महायुतीतील घटक पक्षांनी स्वतंत्रपणे लढण्याची अंतर्गत तयारी सुरू केली असतानाच महाविकास आघाडीतही जमेल तिथे आघाडी आणि जमेल तिथे सवतासुभा होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच तसे संकेत दिले आहेत. पवार यांची ही गुगली आता काय काय राजकीय परिणाम दाखविणार हे पाहावे लागेल.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी, जनसुराज्य शक्ती, शिरोळची राजर्षी शाहू आघाडी यासह काही स्थानिक आघाड्या व काही पक्ष आहेत. महायुतीची सत्ता आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे जिल्ह्यातील सत्ताकारण बदलले. त्याचा परिणाम आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पाहायला मिळेल.
केडीसीसी बँक आणि गोकुळ या दोन बलाढ्य आर्थिक संस्था महाविकास आघाडीच्या ताब्यात होत्या. मात्र, शिवसेना व राष्ट्रवादीतील फुटीमुळे जसे राज्याचे राजकारण बदलले त्याचा परिणाम जिल्ह्यातही झाला. जिल्हा बँकेत हसन मुश्रीफ यांची एकहाती सत्ता आहे. जिल्हा बँकेचा अध्यक्षपदाचा राजीनामा देतो असे म्हणत मुश्रीफ यांनी आपली सत्ता बळकट केली आहे.
गोकुळमध्ये मात्र अरुण डोंगळे यांनी महायुतीचाच अध्यक्ष हा मुद्दा लावून धरल्याने अध्यक्षपदासाठी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी ठरविलेल्या दोन्ही उमेदवारांना थांबावे लागले आणि अध्यक्षपदाची माळ नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात पडली. असे झाले तरी गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुश्रीफ-पाटील यांच्यातील ऐक्याने महाडिक गटाला वेगळे पाडण्यात यश मिळाले.
आता 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण व्हायच्या आहेत. शिवसेना व राष्ट्रवादीतील फूट, भाजपची वाढलेली ताकद यामुळे अनेक शक्तिशाली उमेदवार महायुतीच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे नेत्यांसमोरही उमेदवारी कोणाला द्यायची आणि कोणाला थांबवायचे असा प्रश्न आहे. आपल्याच कार्यकर्त्याला थांबवून त्याची नाराजी ओढवून घ्यायची, त्याचबरोबर असा शक्तिशाली उमेदवार आयता महाविकास आघाडीला मिळू नये म्हणून जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांनी अनोखी शक्कल लढवायचे ठरविले आहे.
यानुसार महायुतीतील घटक पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या आखाड्यात उतरायचे आणि निवडून आल्यानंतर विजेत्यांची गोळाबेरीज करून सत्ता स्थापनेचा दावा करायचे नेत्यांनी ठरविले आहे. यामुळे कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचे समाधान, दुसर्या बाजूला जिल्ह्यात निवडणुकीनंतर आपणच सत्ता स्थापन करून शकतो या दाव्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडे प्रतिमा उजळायची, अशा भूमिकेत महायुतीचे नेते आहेत.
त्याचवेळी शरद पवार यांनीही जिथे जमेल तिथे आघाडी करू, असे म्हणत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत दिले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शरद पवार राष्ट्रवादीला उमेदवार शोधताना फार कष्ट करावे लागणार आहेत. शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या शक्यतेने शिवसेनेला महाविकास आघाडीपासून दूर ठेवावे, असा राज्यातील काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न आहे. आता जिल्ह्यात शिवसेनेला महाविकास आघाडीत घेणार याचा निर्णय स्थानिक नेते घेतील. कारण राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी कोल्हापूर महापालिकेत काँग्रस, राष्ट्रवादी, शिवसेना सत्तेत एकत्र होते.
आता उमेदवारी देताना नेत्यांची कसोटी आहे. त्याचबरोबर काही पक्षांना उमेदवार शोधताना संघर्ष करावा लागणार असून त्यामध्ये शरद पवार राष्ट्रवादीचा समावेश आहे. त्यामुळे पवारांनी टाकलेल्या गुगलीचे काय होणार हे निवडणुकीची हालगी कडाडल्यावर स्पष्ट होणार आहे.