

कोल्हापूर : आमचा विकासाला विरोध नाही, आमचा आराखड्याला विरोध आहे, यामुळे दहा मीटरच काय, दहा इंचही जागा देणार नाही, असा निर्धार अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बाधित व्यापारी, रहिवाशांनी केला.
भूसंपादनाबाबत बैठक सुरू असताना त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक निदर्शने केली. त्यानंतर रहिवासी, व्यापाऱ्यांनी भूमिका मांडली. अंबाबाई तीर्थक्षेत्र विकासाला आमचा विरोध नाही; पण त्यासाठी जो आराखडा तयार केला, तो आम्हाला उद्ध्वस्त करणारा आहे. तीन पिढ्यांहून अधिक काळ आम्ही या ठिकाणी राहत आहोत, व्यवसाय, व्यापार करत आहोत, त्यावरच आमचे कुटुंब आहे; पण आम्हाला विश्वासात न घेता, ज्यांची जागा घेणार, त्यांना आराखड्याची काहीही माहिती न देता थेट जागा संपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे.
आमच्या जागा देण्यास आमचा विरोधच आहे. काही झाले तरी आम्ही जागा देणार नाही. विकासाच्या नावाखाली आमच्या जागा काढून घेतल्या तर आम्ही जगायचे कसे? आमच्या उदरनिर्वाहाचे काय? ज्यांचे हातावरचे पोट आहे त्यांनी काय करायचे? असे सवाल करत, लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी बसवलेली ही बाजारपेठ उद्ध्वस्त करू नका, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. भूसंपादनासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला बधितांपैकी दोघांना बोलावले. ज्यांच्यासाठी बैठक, त्यांनाच बैठकीपासून लांब ठेवले. याबाबत विनंती केल्यानंतर चार लोकांना बैठकीला बोलावण्यात आले. यावरून प्रशासनाची मानसिकता दिसून येते, असेही व्यापाऱ्यांनी संगितले.
यावेळी मारुती अंकलीकर, अमित कारेकर, यतीन पोसरेकर, प्रशांत साळवी, राजेश कनानी, दिनकर लाळगे, रणजित कारेकर, दीपक पेटकर, रोहन दातार, किरण चोपडे, प्रीतम पवार, अभिजित भोसले, स्नेहल कडेकर, स्वाती दट्टे, अर्जुन नलवडे, रोहन रेवणकर, ऋतू कुलकर्णी, रविराज पोवार, प्रसन्न काटवे, प्रियरांजन जोशी, अशोक चंदवाण आदी व्यापारी, रहिवासी उपस्थित होते. यानंतर खासदार शाहू महाराज यांचीही रहिवासी, व्यापाऱ्यांनी भेट घेतली.
आधी अंबाबाई मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करा
यावेळी ‘आधी अंबाबाई मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यांची सुधारणा करा’, ‘विकास हवा, भकास नको’, ‘अंबाबाईसोबत इतर पर्यटनस्थळे विकसित करा’ आदी आशयाचे फलक घेऊन व्यापारी, रहिवासी आंदोलनात सहभागी झाले होते.