Kolhapur | कोल्हापूर महानगरपालिकेला पांगळा घोडा म्हणणाऱ्या आयुक्त डॉ. भारूड यांचा निषेध

आयुक्तांनी माफी मागावी; सर्वपक्षीय कृती समिती, अन्यथा अशा उन्मत अधिकार्‍यांची गरज नाही
Kolhapur Municipal Corporation
Kolhapur | कोल्हापूर महानगरपालिकेला पांगळा घोडा म्हणणाऱ्या आयुक्त डॉ. भारूड यांचा निषेध
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेला पांगळा घोडा म्हणण्याचा अधिकार आयुक्त डाॅ. राजेंद्र भारूड यांना कुणी दिला? आजपर्यंत एवढ्या मोठ्या आयएएएस अधिकारी आणि महापौरांसह नगरसेवकांनी शून्य काम केले का? एक माणूस सहा लाख लोकांवर राज्य करू शकत नाही. कोल्हापूरची जनता महापालिकेची मालक असून आयुक्त नोकर आहेत, असे म्हणत आयुक्त डॉ. भारूड यांचा सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने ॲड. बाबा इंदुलकर यांनी निषेध केला. कोल्हापूरचा अपमान करणाऱ्या आयुक्तांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा अशा उन्मत अधिकाऱ्यांची गरज नाही, असे म्हणत समितीच्या वतीने अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली.

महापौर रूपाराणी निकम यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक झाली. महासभेत आयुक्त डॉ. भारूड यांनी महापालिकेला पांगळा घोडा म्हटल्यावर महापौर म्हणून तुम्ही सभागृहातच पानउतारा करायला पाहिजे होते, दोन बॅगा भरून आल्याचे सुरुवातीला सांगणारे आयुक्त भारूड हे शो करत असल्याचा आरोपही ॲड. इंदुलकर यांनी केला. बाबा पार्टे यांनी कोल्हापूरचा आयुक्तांनी अपमान केल्याचे सांगितले. अनिल कदम यांनी आयुक्त गेले तर महापालिका बंद पडणार नाही, असे सांगितले.

आयुक्त डॉ. भारूड म्हणाले, एक नगरसेवक गेले सहा महिने तेच तेच प्रश्न असल्याचे वारंवार सांगत होते. त्यांना उत्तर देण्यासाठी स्पर्धेतील दोन घोड्यांचे उदाहरण मी दिले. आर्थिकदृष्ट्या कोल्हापूर महापालिका पांगळी आहे. मुंबई, पुणेच्या तुलनेत येथे सुविधा देऊ शकत नाही. मी जेथे काम करतो, त्याचा मला आदर आहे. बैठकीला माजी महापौर आर. के. पोवार, अशोक भंडारे, प्रा. अनिल घाटगे उपस्थित होते.

...तर आयुक्तांनी सायकलवरून फिरावे

महापालिका आर्थिक सक्षम नाही, असे आयुक्त भारूड सांगत आहेत. मग आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी नवीन गाड्यांतून फिरण्याऐवजी सायकलवरून फिरावे, असे सुभाष देसाई यांनी सांगितले.

अन्‌ महापौरांसमोरच आयुक्त डॉ. भारूड बैठकीतून ताडकन उठून गेले

महापालिकेने मुळात पहिली नोटीस चुकीची दिली. महापालिका अधिकारी आणि वकिलांना नवीन कायदे माहिती नव्हते का? सर्किट बेंचने कान पिळल्यानंतर नवी प्रक्रिया सुरू केली, असे इंदुलकर यांनी सांगितले. ते तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण काढण्यावरून महापालिकेतील बैठकीत बोलत होते. त्यावर आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी महासभेने कार्यवाही मान्य आहे. तसेच तुमच्यापेक्षा थोडी जास्त मला कोल्हापूरबद्दल काळजी आहे, असेही इंदुलकर यांनी सांगितले. त्यावर इंदुलकर यांनी तुम्हाला कोल्हापूरची काळजी नाही, असे आयुक्तांना सांगितले. त्यावर मला काळजी नाही तर मला तुमच ऐकण्‍यात काहीही रस नाही असे म्हणून महापौर रूपाराणी निकम यांच्यासमोरच आयुक्त बैठकीतून ताडकन उठून गेले. महापौर निकम यांच्यासह कृती समितीने आयुक्त डॉ. भारूड यांचा निषेध केला. तसेच महापौर निकम यांनी आयुक्तांचा चांगलाच समाचार घेऊ, असा इशाराही बैठकीत दिला. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने पाणीपट्टी दरवाढ आणि तावडे हॉटेल परिसर अतिक्रमणप्रश्नी महापौर व आयुक्तांसोबत महापालिकेत बैठक झाली. इंदुलकर यांनी अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे महापालिकेवर वर्षाला पाण्यासाठी ३७ कोटींचा आर्थिक भुर्दंड पडत असल्याचा आरोप केला. बैठकीला माजी महापौर आर. के. पोवार, अशोक भंडारे, बाबा पार्टे, प्रा. अनिल घाटगे, गजानन तोडकर यांच्यासह इतर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news