

कोल्हापूर : बोरपाडळे (ता. पन्हाळा) परिसरात भेसळयुक्त बनावट दारूची वाहतूक करणार्या दोघांना राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने बुधवारी बेड्या ठोकल्या. दशरथ जालिंदर कुंभार (वय 29, रा. माळवाडी, भेंडवडे, ता. हातकणंगले), जयदीप रघुनाथ कांबळे (36, रा. मौजे तासगाव, ता. हातकणंगले) अशी नावे आहेत. तस्कराकडून 2 लाख 28 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेसळयुक्त बनावट दारूचे रॅकेट चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे, असे राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभागाच्या अधीक्षका स्नेहलता नरवणे, उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी सांगितले.संशयित प्लॉस्टिकच्या पोत्यात भरून भेसळयुक्त, बनावट दारूची तस्करी करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. कोल्हापूर-आंबा महामार्गावर पथकाने सापळा रचून संशयितांना जेरबंद करण्यात आले. प्राथमिक चौकशीत भेसळयुक्त बनावट दारू शाहूवाडी तालुक्यातील निळे येथून आणल्याची त्यांनी माहिती दिली आहे.