कोल्हापूर : कोल्हापूर शहरात नगरोत्थान योजनेतून होत असलेल्या रस्त्यांच्या कामात प्रमाणापेक्षा कमी डांबर वापरले जात असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, कामे दर्जेदार होत नसल्याने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी सोमवारी ठेकेदार मे. एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर, डेव्हलपर्स यांना दंडात्मक कारवाईची नोटीस बजावली आहे.
प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी गत आठवड्यात रस्त्यांच्या कामांची पाहणी केली होती. यावेळी दर्जाबाबत शंका येताच जागेवर पंचनामा करून त्या ठिकाणचे सॅम्पल घेऊन तपासणी केली असता टेस्टिंगमध्ये गुणवत्तेपेक्षा कमी प्रमाणात डांबराची क्वाँटिटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली. प्रकल्प सल्लागार संदीप गुरव अँड असोसिएटस् यांनी दसरा चौक ते नंगीवली चौक या रस्त्याच्या कामावर ठेकेदारामार्फत मटेरियल टेस्टिंगसाठी साईट लॅब, साईट ऑफिस व कामाची गुणवत्ता वेळोवेळी तपासणी केलेली नाही. साईटवर काम करताना सेन्सर पेव्हर नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली. तसेच गत 11 महिन्यांच्या कालावधीमध्ये 60 टक्के काम पूर्ण करून घेतले नाही, तसेच बारचार्ट तयार केला नसल्याने या सल्लागार कंपनीला या कामावरून कमी का करण्यात येऊ नये, याबाबत नोटीस बजावली आहे.
100 कोटींतून 16 रस्त्यांची कामे मुदतीत करणे बंधनकारक आहे. रस्ते गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करून घेणे, कामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी शहर अभियंता यांची आहे. सल्लागार कंपनी व ठेकेदारांशी समन्वय ठेवून सर्व बाबींची पूर्तता करून घेणे गरजेचे होते. ही कामे झाली नसल्याने शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना 5,000 रुपये व तत्कालीन शहर अभियंता तथा जलअभियंता हर्षजित घाटगे यांना 4,000 रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे. तसेच कनिष्ठ अभियंता निवास पोवार हे दसरा चौक ते नंगीवली चौक या रस्त्यावर प्रशासक फिरती करताना साईटवर उपस्थित नसल्याने त्यांनाही 3,500 रुपये इतका दंड केला आहे.
* डांबराची क्वाँटिटी कमी
* 11 महिन्यांत केवळ 12 टक्केच काम
* शहर अभियंता सरनोबत यांना 5,000 रुपये दंड
* जलअभियंता हर्षजित घाटगेंना 4,000 दंड
* कनिष्ठ अभियंता निवास पोवारांना 3,500 रुपये दंड