

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेसाठी 15 रोजी मतदान होणार असून, प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. कर्मचार्यांसाठी शनिवार, दि. 10 व रविवार, दि. 11 रोजी पोस्टल मतदानाची सुविधा उपलब्ध केली आहे. शहरातील सातही निवडणूक कार्यालयांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेसाठी सुमारे 3 हजार कर्मचारी नियुक्त असून, यापैकी महापालिका हद्दीतील कर्मचार्यांना पोस्टल मतदानाची सुविधा दिली आहे. या कर्मचार्यांचे पहिले प्रशिक्षण पार पडले असून, सुमारे 400 कर्मचार्यांनी पोस्टल मतदानासाठी अर्ज केले आहेत. मंगळवारी दुसरे प्रशिक्षण होणार आहे.
दरम्यान, मतपत्रिका छपाईचे काम अंतिम टप्प्यात असून, मतमोजणीचे नियोजन पूर्ण केले आहे. राजोपाध्यनगर कार्यालयांतर्गत येणार्या प्रभागांसह राजारामपुरीतील व्ही. टी. पाटील सभागृह परिसरातील प्रभागांसाठी व्ही. टी. पाटील सभागृहात मतमोजणी होणार आहे. शहाजी कॉलेज, महासैनिक प्रशिक्षण केंद्र व हॉकी स्टेडियम निवडणूक कार्यालयांतर्गत येणार्या प्रभागांची मतमोजणी रमणमळा येथील शासकीय गोदाम हॉलमध्ये होणार आहे. दुधाळी व गांधी मैदान येथील निवडणूक कार्यालयांतर्गत प्रभागांची मतमोजणी संबंधित ठिकाणीच केली जाणार असून, प्रत्येक ठिकाणी दहा टेबलवर मतमोजणी होणार आहे.
केएमटी सेवा राहणार बंद
ईव्हीएम मशिन, मतदान साहित्य तसेच मतदान प्रक्रियेसाठी 113 वाहनांची व्यवस्था केली आहे. यामध्ये 65 केएमटी बसेस, 45 एसटी बसेस आणि 3 जीपचा समावेश आहे. मतदान व निकालाच्या दिवशी केएमटी बससेवा बंद राहणार आहे.
595 मतदान केंद्रांवर होणार मतदान
शहरातील सातही निवडणूक कार्यालयांच्या हद्दीत प्रभागनिहाय एकूण 595 केंद्रांवर मतदान होणार आहे. एका प्रभागात किमान 24 ते कमाल 41 मतदान केंद्रे असतील. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, एक मतदान अधिकारी, तीन सहाय्यक मतदान अधिकारी, एक शिपाई व एक कर्मचारी असेल.
ईव्हीएम मशिन आज निवडणूक कार्यालयांत दाखल
महापालिकेच्या 81 जागांसाठी एकूण 327 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे मोठ्या संख्येने ईव्हीएम मशिनची आवश्यकता आहे. उमेदवारांच्या संख्येनुसार सुमारे 1300 ईव्हीएम मशिन वापरण्यात येणार असून, त्यांची तपासणी पूर्ण झाली आहे. रमणमळा येथील शासकीय गोदाम हॉलमधून या मशिन सात निवडणूक कार्यालयांमध्ये मंगळवारी पोहोचविण्यात येणार आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी मतपत्रिका लोड करून ईव्हीएम मशिन थेट मतदान केंद्रांवर पाठविण्यात येणार आहेत.