

गारगोटी : आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा मंदिराचा वार्षिक भंडारा उत्सव व अमावस्या यात्रेस दरवर्षी लाखो भाविक उपस्थित राहतात. यंदा होणाऱ्या यात्रेस सुमारे 8 ते 10 लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता गर्दी नियंत्रण व अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने दि. 15 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते 19 मार्च रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पाच दिवस वाहतूक मार्गात बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत.
वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग : मुरगूड - कोल्हापूर - मुदाळ तिट्टा - गारगोटी - राधानगरी या मार्गावरील वाहतूक निढोरी- सोनाळी रोड - बिद्री - मुदाळ तिट्टामार्गे वळविण्यात येणार आहे. तसेच मुदाळ तिट्टा ते मुरगूड - निपाणी मार्गावरील वाहतूक मुदाळ -सूतगिरणमार्गे वाघापूर फाटा - निढोरी या पर्यायी मार्गाने सोडण्यात येणार आहे. नो पार्किंग झोन : मुदाळ तिट्टा ते निढोरी दरम्यानचा संपूर्ण रस्ता तसेच आदमापूर येथील उड्डाण पुलाखालील रस्ता या ठिकाणी सर्व वाहनांसाठी नो पार्किंग झोन जाहीर केला आहे.
भाविकांसाठी पार्किंग व्यवस्था : यात्रेस येणाऱ्या भाविकांच्या वाहनांसाठी भीष्मा पार्किंग (उत्तर बाजू व दक्षिण बाजू), आर. के. इंजिनिअरिंग पार्किंग तसेच श्री बाळूमामा देवालयाची साडेसात एकर जागा वाहन पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर एस.टी. बससाठी श्री बाळूमामा देवालयाची साडेतीन एकर जमीन राखीव ठेवली आहे. यात्राकाळात नियमांचे काटेकोर पालन करावे, पोलिसांना सहकार्य करावे आणि अधिकृत पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन भुदरगड पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी केले आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी आवश्यकतेनुसार इतर काही रस्तेही तात्पुरते बंद करण्यात येऊ शकतात, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.