

कोल्हापूर : घरफाळा घोटाळ्यातील संशयित आरोपी संजय शिवाजीराव भोसले यांच्याकडे केएमटीचे अतिरिक्त व्यवस्थापक पद सोपविण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अधिकाऱ्याकडे आर्थिक व्यवहाराचे पद सोपविल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली आहे. प्रशासनाच्या विरोधात त्यामुळे उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे.
कोल्हापूर महापालिकेत कोट्यवधींचा घरफाळा घोटाळा झाला आहे. त्याप्रकरणी काही जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. संजय भोसले यांनी संबंधितांवर दाखल केला होता; परंतु चौकशीअंती भोसले यांच्या कालावधीतही घरफाळ्यात अपहार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने संजय भोसले यांच्यावर गुन्हा दाखल केला. परिणामी, फिर्यादीचा आरोपी झाल्याची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली होती. त्यानंतर भोसले यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली.
नगरसेवकांची सूचना... स्मशानभूमीत काम
महापालिकेत अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे निलंबित कर्मचाऱ्यांना फुकटचा पगार देण्यापेक्षा त्यांना स्मशानभूमीत काम द्यावे, अशी सूचना नगरसेवकांनी महासभेत केली होती. त्यानंतर घरफाळा घोटाळ्यासह इतर लाचप्रकरणी निलंबित असलेल्या काही अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करून घेण्यात आले. भोसले यांना वर्कशॉप विभागाचा कार्यभार देण्यात आला. मात्र, काही दिवसांतच पुन्हा त्यांना अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक केले. त्यामुळे अधिकाऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
प्रशासनाचा हेतू काय?
शासन निर्णयानुसार निलंबित होऊन विभागीय चौकशी सुरू असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अकार्यकारी पदाचे कामकाज द्यावे लागते. केएमटीचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पद हे अकार्यकारी पद नाही. येथे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होतात. मग, भोसले यांना अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक करण्यामागे प्रशासनाचा हेतू काय, असा प्रश्न अधिकारीवर्गांतून विचारला जात आहे.