

अनुराधा कदम
कोल्हापूर : जेमतेम परिस्थितीतही तिचा संसार फुलत होता. मात्र, नवरा अचानक परागंदा झाला तो पुन्हा आलाच नाही. मुलाला ऐन तारुण्यात अर्धांगवायूने ग्रासले. गेल्या तीन वर्षांपासून तरणाताठ्या मुलाची एक बाजू विकलांग झाली आहे. परागंदा पतीची उणीव सहन करत, अर्धांगवायूग्रस्त तरुण मुलाला उपचार मिळावेत म्हणून वयाच्या पासष्टीत लक्ष्मीबाई जगताप यांनी परिस्थितीशी लढा देत दुर्गेचे रूप घेतले आहे. खचलेल्या कुटुंबासाठी ही माऊली आधारवड बनली आहे.
मंगळवार पेठेतील सुबराव गवळी तालीम परिसरातील वाटणीला आलेल्या दोन छोट्या खोल्यांमध्ये 65 वर्षांच्या लक्ष्मीबाई जगताप मुलासह राहतात. 2012 साली त्यांचे पती भिकाजी अचानक काहीही न सांगता घरातून निघून गेले. तेव्हा मुलगा राजेश 13 वर्षांचा होता. गृहिणी असलेल्या लक्ष्मी यांनी पतीचा खूप शोध घेतला, मात्र त्यांना निराशाच आली. अखेर पदर खोचून त्यांनी मिळेल ते काम करून घर सावरले. पण, नियतीचा फेरा अजून बाकी होता. मुलाला नोकरी मिळेल आणि पुन्हा घर उभं राहील या आशेवर जगणार्या लक्ष्मी यांना नियतीने धक्का दिला. तरुण मुलाला अर्धांगवायूचा झटका आला. तब्येतीच्या तक्रारी वाढल्या. तीन वर्षापासून मुलगा परावलंबी आहे तर वयाच्या पासष्टीत लक्ष्मी यांचा नियतीशी लढा सुरूच आहे.
मुलगा आजारी पडला अशा परिस्थितीतही साठी उलटलेल्या लक्ष्मी यांनी खंबीरपणे आधार दिला. मुलाला महिन्याला किमान आठ हजार रुपयांची औषधे लागतात. कधी खाद्यपदार्थाची ऑर्डर घेत तर कधी मिळेल ते काम करत त्यांची लढाई सुरू आहे. स्वत:चे वाढते वय, शरीरातील कमतरता, वयोमानाने डोकं वर काढणारे आजार यांची तमा न बाळगता लक्ष्मी यांनी परिस्थितीपुढे दुर्गेचे रूप घेतले आहे. मलाच खंबीर राहावे लागेल हा त्यांचा मंत्र आहे.