कोल्हापूर : अवैध गर्भलिंग निदान, गर्भपात रॅकेटचा पर्दाफाश

फुलेवाडी, बुधवार पेठेसह जोतिबा येथे कारवाई
Pregnancy diagnosis
फुलेवाडी येथे तपासणी करताना अधिकारी.
Published on
Updated on

कोल्हापूर/फुलेवाडी : अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणार्‍या रॅकेटचा गुरुवारी पर्दाफाश करण्यात आला. जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईत बोगस डॉक्टर, पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगारासह तिघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कोल्हापूर शहरातील फुलेवाडी आणि बुधवार पेठ येथे तसेच जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा) येथे छापे टाकण्यात आले. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. कोल्हापुरात पुन्हा एकदा गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याचे यानिमित्ताने उघड झाले आहे. याप्रकरणी दगडू बाबूराव पाटील ऊर्फ डी. बी. पाटील (45, रा. राजलक्ष्मीनगर देवकर पाणंद), गजेंद्र बापूसो कुसाळे (37, रा. शिरसे, ता. राधानगरी) व बजरंग श्रीपती जांभिलकर (31, रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा) या तिघांना जुना राजवाडा पोलिसांनी रात्री अटक केली.

देवकर पाणंद येथील डॉ. डी. बी. पाटील याने काही दिवसापूर्वी फुलेवाडी, तिसरा बसस्टॉप परिसरात ‘प्रतीक्षा’ नावाने क्लिनिक सुरू केले आहे. या रुग्णालयात अवैध गर्भलिंग निदान केले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार आरोग्य विभागाने गुरुवारी दुपारी डॉ. पाटील याला फुलेवाडी येथील रुग्णालयावर छापा टाकून ताब्यात घेतले. यानंतर पथकातील वैद्यकीय अधिकार्‍यांनी रुग्णालयाची झाडाझडती घेतली. रुग्णालयाचा कोपरा नि कोपरा व सारा परिसर पिंजून काढला. या तपासणीत पथकाला संशयास्पद औषधे सापडली. यामध्ये काही मुदतबाह्य झालेल्या औषधांचा तसेच उत्तेजित औषधांचा साठा आढळून आला. काही रिकाम्या इंजेक्शनसह बनावट प्रमाणपत्रेही पथकाच्या हाती लागली.

या कारवाईनंतर पथकातील अधिकार्‍यांनी चौकशी सुरू केली. यावेळी बुधवार पेठेतील एका भाड्याच्या घरात आजच सोनोग्राफी मशिन ठेवण्यात आल्याचे समजले. यानंतर पथकाने आपला मोर्चा या घराकडे वळवला. याठिकाणी आढळून आलेले सोनोग्राफी मशिन पथकाने जप्त केले. यानंतर डॉ. पाटील यांचे जोतिबा डोंगर येथेही रुग्णालय असल्याची चौकशीत माहिती मिळाली. यानंतर पथकाने जोतिबा डोंगर येथे जाऊन त्या रुग्णालयावरही छापा टाकला. या ठिकाणीही काही संशयास्पद औषधे, कागदपत्रे आढळून आल्याचे पथकातील अधिकार्‍यांनी सांगितले. यानंतर पथकाने डॉ. पाटील याच्यासह जुना राजवाडा पोलिस ठाणे गाठले. रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.

जिल्ह्यात खळबळ

पुरोगामी जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची केंद्रे वाढत आहेत. त्यावर आळा घालण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यात मोठी कारवाई झाली होती. त्यानंतर पुन्हा अवैध गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारे केंद्र उघडकीस आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मोठी टोळी कार्यरत असण्याची शक्यता

याप्रकरणी तिघाजणांना ताब्यात घेण्यात आले असले तरी यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुग्णांचा शोध घेणे, रुग्णांची तपासणी करणे आणि आवश्यकता वाटल्यास गर्भपात करणे याकरिता मोठे कमिशन देऊन लोकांना सहभागी करून घेतले जात असावे, अशी शक्यता आहे. तसेच ही टोळी सीमाभागासह कोकणातही विस्तारलेली असावी, अशीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news