

कोल्हापूर : शहरातील अतिक्रमण निर्मूलनासाठी ठोस कृती आराखडा करा, व्हीनस कॉर्नर गाडी अड्ड्यातील महापालिका जागेच्या हद्दी निश्चित करून तेथील अतिक्रमण तत्काळ हटवा, असे आदेश आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांनी गुरुवारी दिले. न्यायालयीन प्रकरणांतील स्थगिती उठविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनाला केली.
डॉ. भारूड यांनी विविध प्रकल्पांची पाहणी करून कामांना गती देण्याच्या सूचना केल्या. गोकुळ हॉटेल परिसरातील पार्किंग सुरू करा, इस्टेट विभागाने भाडे व मालकी करारांची पडताळणी करून मनपाच्या रिक्त जागांवर मालकी फलक लावा अशा सूचना दिल्या.
केशवराव भोसले नाट्यगृह येथे व्यवस्थापन खर्चाचा आढावा घेऊन धोरण निश्चित करा, खासबाग मैदान लॉन स्वच्छ ठेवा, सरस्वती टॉकीज पार्किंग प्रकल्पात गाळेधारकांचे स्थलांतर करा, उर्वरित गाळ्यांचा लिलावासाठी बाजारभाव निश्चित करा, असे आदेश त्यांनी दिले. अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ व शिल्पा दरेकर, उपायुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक आयुक्त उज्ज्वला शिंदे व स्वाती दुधाणे, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, उद्यान अधीक्षक समीर व्याघ—ांबरे, मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, उपशहर अभियंता महादेव फुलारी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
राजर्षी शाहू समाधी स्मारक काम पूर्ण करा
रंकाळा तलावात फिशिंग टेंडर व बोटिंग महसूल याची माहिती घेत उत्पन्न वाढवा. सीएसआरमधून उद्यानांची देखभाल व दुरुस्ती, ऐतिहासिक माहिती फलक आराखडा तयार करा. राजर्षी शाहू महाराज समाधी स्थळाच्या दुसर्या टप्प्यातील कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे लवकर पूर्ण करून उद्घाटनाचे नियोजन करा, असे त्यांनी सांगितले.