

कोल्हापूर : बदली प्रक्रियेमध्ये दिव्यांगांसाठी असणार्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग असलेले खोटी प्रमाणपत्रे सादर केल्याचे उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने शिक्षकांवर कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत 17 शिक्षकांना निलंबित करण्यात आले असून 15 शिक्षकांना पुढील तपासणीसाठी पुणे आणि मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात आल्यामुळे आणखी 15 शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार आली आहे.
शिक्षक बदलीचा विषय दरवर्षी जिल्हा परिषदेत गाजत असतो. त्यामुळे या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने शासनाकडून थेट करण्यात येत आहेत. बदलीमध्ये दिव्यांगांसाठी सवलती आहेत. त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र जोडावे लागते; परंतु काही शिक्षकांनी दिव्यांग नसताना दिव्यांगांचे प्रमाणपत्र मिळविल्याच्या तक्रारी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात आल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली. कोल्हापुरामध्ये साधारणपणे 350 शिक्षकांनी दिव्यांग प्रमाणपत्र सादर केली होती. त्या सर्वांची सीपीआरमध्ये तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये आतापर्यंत कोल्हापूर जिल्हा परिषदेतील 17 शिक्षकांनी दिव्यांगाचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आल्याने त्यांना निलंबित केले आहे.
सीपीआर रुग्णालयात प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यानंतरही 15 शिक्षकांना पुढील सखोल तपासणीसाठी पुणे येथील ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या तपासणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या शिक्षकांबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे या अहवालाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.