

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ठोस पावले उचलत असून, प्रदूषण करणार्या घटकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा या मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
साखर कारखाने, कापड गिरण्या व इतर उद्योगांनी त्यांच्या कारखान्यांतून बाहेर पडणार्या सांडपाण्याचा शंभर टक्के पुनर्वापर करणे बंधनकारक आहे. हे पाणी नदीमध्ये थेट सोडण्यास बंदी असून, पाणी सोडणार्या उद्योगांवर कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या अधिकार्यांची बैठक घेऊन पंचगंगेच्या प्रदूषणाच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेतला. महापालिकेने ‘एसटीपी’ प्रकल्पांच्या माध्यमातून सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू केली आहे. सध्या दररोज 90 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जात असून, लवकरच आणखी काही प्रकल्प कार्यान्वित होतील. याबाबत महापालिकेचे काम चांगले असल्याचे कदम म्हणाले.
नागरिकांनी स्वतः कचर्याचे वर्गीकरण करून घंटागाडीकडे द्यावे, यासाठी जनजागृतीची गरज असल्याचे ते म्हणाले. तसेच, सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी असतानाही त्याचा सर्रास वापर होत असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी उत्पादक व विक्रेत्यांवरच थेट कारवाई करण्याचे आदेश दिले. सामान्य नागरिकांऐवजी अशा उत्पादन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही ते म्हणाले.