

संदीप बिडकर
इचलकरंजी : गर्भलिंग निदान व तपासणी करून स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. चंद्रकांत गायकवाड काही काळासाठी हातकणंगले येथील ग्रामीण रुग्णालयात सेवा बजावत होता. त्यावेळीही त्याने येथील शासकीय रुग्णालयात सर्वसामान्य गरीब रुग्णांकडून पैसे घेतल्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे त्याची येथील कारकीर्दही वादग्रस्तच राहिली. तत्कालीन काळात शिवसेनेने केलेल्या आंदोलनामुळे त्याची मराठवाड्यात बदली करण्यात आली होती.
१९९६-९७ या कालावधीत डॉ. गायकवाड हातकणंगले ग्रामीण रुग्णालय मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होता. प्रसूतीसाठी येणार्या गरीब घरातील महिलांची अडवणूक करून प्रत्येक महिलेकडून दीड हजार रुपये घेतले जात होते; अन्यथा त्यांना १५-१५ दिवस डिस्चार्ज दिला जात नव्हता. तत्कालीन काळात शिवसेना-भाजप युतीचे सरकार असल्यामुळे याची माहिती तालुक्याच्या शिवसैनिकांना मिळाली. त्यावेळी शिवसैनिकांनी दवाखान्याला भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली व गायकवाडविरोधात तत्कालीन आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यानंतर त्याची वरिष्ठ पातळीवर तपासणी करण्यात आली.
आपणावर कारवाई होणार, हे लक्षात आल्यानंतर गायकवाडने शिवसैनिकांवर जातिवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार तत्कालीन तहसीलदारांकडे केली होती. परंतु, त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले. पुन्हा शिवसैनिकांनी त्याच्या बदलीसाठी प्रयत्न केले. या सर्व गोष्टीचा परिपाक म्हणून तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी डॉ. गायकवाडची मराठवाड्यात बदली केली. यावेळी तत्कालीन शिवसैनिकांच्या वतीने राजू गोरे, इमाम मुल्ला, संजय देवकाते, आळते शाखाप्रमुख बापू देसाई, हातकणंगले शहरप्रमुख सुरेश खोत आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
डॉ. गायकवाडच्या मालमत्तांच्या चौकशीची मागणी
चंद्रकांत गायकवाड हा मूळचा रुकडी (ता. हातकणंगले) गावचा. अतिशय गरीब घराण्यात त्याचा जन्म झाला. शेतात मोलमजुरी करून आईने चंद्रकांतसह इतर भावंडांना शिकवले. मिरज मेडिकल कॉलेजमधून त्याने पदवी संपादन केली. त्यानंतर तो शासकीय सेवेत रुजू झाला. परंतु, ज्या-ज्या वेळी तो कायद्याच्या कचाट्यात सापडला त्या-त्या वेळी राज्यातील तत्कालीन लोकप्रतिनिधींनी त्याला पाठीशी घालण्याचे काम केल्याची माहिती समोर येत आहे. शासकीय सेवेत असताना व त्यानंतरही त्याने अनेक ठिकाणी शेतजमिनी व मालमत्ता मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याची प्राथमिक माहिती आहे. याची सविस्तर चौकशी व्हावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे.
शंभरहून अधिक गर्भपात किटची खरेदी
तीनशेहून अधिक स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या डॉ. चंद्रकांत गायकवाडला सोमवारी करवीर पोलिसांनी शाहूपुरीतील तीन मेडिकलमध्ये फिरवले. या तीन मेडिकलमधून गायकवाडने १०० हून अधिक गर्भपाताची किट (एमटीपी) खरेदी केल्याची माहिती समोर आली असून, येथील बिले पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. गायकवाडने रोख आणि ऑनलाईन पद्धतीने ही बिले भरल्याचे तपासात निष्पन्न झाले.
डॉ. चंद्रकांत गायकवाड याची पोलिस कोठडी मंगळवारी (दि. ४) संपत आहे. यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. अटक केलेल्या रेखा वरुटे आणि सागर तराळ यांच्याकडे कसून चौकशी सुरू असून, सोमवारी ११ दाम्पत्यांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी गर्भलिंग निदान आणि गर्भपाताची कबुली दिली.
ऑन द स्पॉट तपास
स्त्रीभ्रूण हत्याप्रकरणी डॉ. गायकवाडला सोमवारी करवीर पोलिसांनी शाहूपुरीतील तीन मेडिकलमध्ये नेऊन प्रत्यक्ष तपास केला. पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी या तीनही मेडिकलमधून डॉ. गायकवाडच्या नावाने असलेल्या बिलांची पडताळणी केली. यामध्ये १०० बिले गर्भपाताच्या किटची असून, याचे जीएसटीसह पैसे गायकवाडने भरले आहेत. काही रोख, तर काही ऑनलाईन पद्धतीचे व्यवहार असून, बिलांच्या प्रत पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. याच दुकानातून ऑपरेशनसाठी लागणारे इतर साहित्यही गायकवाडने खरेदी केले. मेडिकल दुकानदार आणि गायकवाडची समोरासमोर तीन तास चौकशी केली असून, नजीकच्या काळातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले.