

कागल : येथील आरटीओ चेकपोस्ट खासगी नाक्यावरील महामार्गावर लावण्यात आलेल्या अडथळ्यांजवळ सलग तिसर्या दिवशी बुधवारी झालेल्या अपघातात शब्बीर रहीम हजरत देसाई (वय 52, रा. हेर्ले, ता. हातकणंगले) या आरोग्यसेवकाचा बळी गेल्याने संतप्त जमावाने महामार्ग रोखून धरत कर्मचार्यांची केबिन उलथवून टाकली. महामार्गावर लावण्यात आलेले अडथळे काढून फेकून देण्यात आले. सर्व वाहने काही काळ नाक्याऐवजी महामार्गावरून सोडून देण्यात आली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीड ते दोन तास नाका बंद केला होता. पावत्या न करताच वाहने सोडून देण्यात येत होती.
हुक्केरी येथे मृत नातेवाईकाच्या सांत्वनासाठी शब्बीर देसाई व मोहम्मद कादर खतीब दुचाकीवरून (एम.एच. 09 डीसी 6788) निघाले होते. कागल येथील चेक पोस्ट नाक्यावर दुपारी बारा वाजता आल्यानंतर महामार्गावरील अडथळ्यांतून जात असताना मागून आलेल्या आणि नाक्यात जाणार्या ट्रकने (के.ए. 25 एबी 2734) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने देसाई यांचा काँक्रीटच्या रस्त्यावर डोक्यावर आपटल्याने रक्तस्राव होऊन जागीच मृत्यू झाला. मृतदेह ट्रकच्या चाकामध्ये पडलेला होता, तर महम्मद खतीब किरकोळ जखमी झाले. मृत व जखमी नात्याने मामा-भाचे आहेत. देसाई हे भादोले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लाटवडे येथे आरोग्यसेवक म्हणून काम करीत होते. दोन दिवसांपूर्वी याच ठिकाणी दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला होता. नाका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सलग तिसर्या दिवशी अपघात होऊन पुन्हा एकाचा बळी गेला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दीड ते दोन तास नाका बंद केला होता. नाका बंद करण्यात यावा, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. संतप्त झालेले जमावातील नागरिक अपघाताचा जाब विचारण्याकरिता नाक्याच्या कार्यालयाकडे जात असताना नाक्यामध्ये ड्युटीवर असलेले मोटार वाहन निरीक्षक संदीप देसाई यांनी येऊन जमावाला शांत केले. त्यांच्या मागण्या शांतपणे ऐकून घेतल्या आणि मागण्यांबाबत कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरातील प्रमुख कार्यकर्ते अजित मोडेकर, महाळू करीकट्टे, सुधाकर चव्हाण, शुभम मोडेकर, तसेच दीपक कांबळे, मीना वाघमारे व इतर काही कार्यकर्ते जमा झाले. त्यांनीदेखील आक्रमक पवित्रा घेत अधिकार्यांना चांगलेच धारेवर धरले. महामार्गावरील अडथळे तत्काळ काढून घेण्यात यावेत, अशी जोरदार मागणी केली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली.