

कोल्हापूर : पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीतील फरार आणि गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असलेल्या गुंडांनी पुणे पोलिसांना चकवा देत कोल्हापूर शहरासह भुदरगड तालुक्यात आश्रय घेतल्याचे उघड झाले आहे. पुणे खंडणीविरोधी पथकाने भुदरगड पोलिसांच्या मदतीने कूर (भुदरगड) येथे छापा टाकून गुंड पंकज वाघमारेपाठोपाठ खंडणीखोर गणेश ऊर्फ सुरज अशोक वड्ड (30) याला बेड्या ठोकल्या.
मुंबई, पुण्यातील कुख्यात टोळ्यांमधील गुंड राधानगरी, भुदरगड तालुक्यात आश्रयाला येऊ लागल्याने भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा कळीचा बनण्याची शक्यता आहे. आंदेकर टोळीतील गुंड गणेश ऊर्फ सुरज वड्ड फरारी गुन्हेगार आहे. खंडणीच्या गुन्ह्यात वड्ड याच्याविरुद्ध मोका अंतर्गत कारवाई झाल्यापासून दोन वर्षांपासून तो पुणे पोलिसांना चकवा देत आहे. वड्ड याचा सहकारी पंकज वाघमारे हाही काही काळापासून कूर परिसरात वास्तव्याला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. 3 डिसेंबरला खंडणीविरोधी पथकाने छापा टाकून त्यास जेरबंद केले.
वाघमारे याच्या चौकशीत गणेश ऊर्फ सुरज वड्ड याचा कोल्हापुरातील मंगळवार पेठ, रंकाळा परिसरात वावर असल्याची माहिती पुणे खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती. पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख, अश्विनी जगताप, सहायक निरीक्षक राजेश माळगावे, गौरव देव यांच्या पथकाने कोल्हापुरात शोधमोहीम राबवल्यानंतर संशयित गणेश वड्डचाही कूर परिसरात वावर असल्याची माहिती मिळाली. मंगळवारी रात्री उशिरा पथकाने कूर येथे छापा टाकून संशयिताला जेरबंद केले.
वाघमारे व वड्ड याला ताब्यात घेतल्याची भुदरगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्तात संशयिताला पुण्याला नेण्यात आला. दोन्हीही संशयितांना फरारी काळात कोल्हापूर व भुदरगड तालुक्यात कोणी कोणी आश्रय दिला, याची पुणे खंडणीविरोधी पथकातील अधिकारी चौकशी करीत आहेत. गुन्हेगारी टोळ्यांतील दोन गुंडांना खंडणीविरोधी पथकाने जेरबंद केल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.
बिहारसह झारखंडमधील गॅगस्टर्स राहुल पांडे आणि प्रेम यादव यांच्यातील टोळीयुद्धातून कुख्यात गॅगस्टर्स प्रेम यादव याची हत्या करून फरार झालेल्या शार्पशूटर रोहितकुमार राजेश सिंग आणि त्याचा साथीदार कुणालकुमार तारकेश्वर मांझी (पासवान) याने कोल्हापूरसह शिये परिसरात फरारी काळात आश्रय घेतला होता. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिये (ता. करवीर) येथील रामनगर परिसरात छापा टाकून सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. मुंबई, पुण्यासह झारखंड, बिहारातील कुख्यात टोळ्यांतील फरार गुंडांचा कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातील आश्रय कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने डोकेदुखीचा ठरणारा आहे.