

गारगोटी : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना कोल्हापूरचे पालकमंत्री पद जाहीर होताच गारगोटीसह भुदरगड तालुक्यात फटाक्याची आतषबाजी करण्यात आली. ना. प्रकाश आबिटकर यांच्या रूपाने राधानगरी विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच पालकमंत्रीपद मिळाले आहे.
गेले कित्येक दिवस पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नव्हता त्यामुळे जिल्ह्यातील लोकांचे पालकमंत्री पदाकडे लक्ष लागून राहिले होते. ना. प्रकाश आबिटकर, ना. चंद्रकांतदादा पाटील, ना. हसन मुश्रीफ यांची नावे चर्चेत होती. जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आमदार असलेल्या पक्षाला पालकमंत्री पद दिले जाईल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सर्वाधिक आमदार असल्यामुळे ना. प्रकाश आबिटकर यांचे नाव आघाडीवर होते. शनिवारी रात्री कोल्हापूरच्या पालकमंत्रीपदी ना. प्रकाश आबिटकर यांचे नाव जाहीर होताच गारगोटीसह भुदरगड तालुक्यात जोरदार फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तालुक्यात फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती.