

फुलेवाडी : रंकाळा तलावातील संध्यामठ ते तांबट कमान परिसरातील पाण्यात मृत माशांचा खच पडला असून प्रदूषित पाण्यामुळे जलचरांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. प्रदूषणावर महानगरपालिकेने कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.
रंकाळा तलावात चारीबाजूंनी सांडपाणी मिसळत असल्याने पाणी दूषित झाले आहे. यापूर्वीही अनेकवेळा मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपासून संध्यामठ ते तांबट कमान परिसरात मासे मृत होऊन पडलेले असून काही मासे कुजल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. लहान माशांसह 5 ते 7 किलो वजनाचे हे मासे आहेत. दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिक व पर्यटकांना नाकाला रुमाल बांधून फिरण्याची वेळ आली आहे.
शाम सोसायटी, परताळा, शाहू उद्यान परिसरातून सांडपाणी थेट तलावात मिसळते. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने हे मासे मरत आहेत. सांडपाण्यामुळे पाण्याला पांढरा शुभ— फेस येत असून पाणी हिरवेगार होत आहे. महापालिका अधिकारी व प्रदूषण मंडळ प्रत्येकवेळी पाण्याचे नमुने घेऊन जातात. त्याचे पुढे काय होते, हे कोणालाच कळत नाही. अधिकारी फक्त वेळकाढूपणा करीत आहेत.
तलावात मिसळणारे सांडपाणी बंद होण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण अधिकारी यांनी एकत्र येऊन यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. रंकाळा हा कोल्हापूरचा श्वास आहे. त्यामुळे रंकाळाप्रेमी रस्त्यावर उतरून प्रशासनास जाग आणल्याशिवाय राहणार नाहीत, अशी भावना रंकाळाप्रेमींनी व्यक्त केली.