

राशिवडे : भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जिल्हा परिषद निवडणूक व कारखान्यातील तत्सम कारणावरून धीरज डोंगळे व सुनील खराडे या दोन संचालकांत जोरदार वादावादी झाली. दोघांचेही समर्थक मोठ्या संख्येने परिसरात जमा झाल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील व संचालकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या वादामुळे संचालक मंडळांमध्ये धुमसणारा वाद चव्हाट्यावर आला आहे.
सोमवारी संचालक मंडळाची मासिक बैठक होती. यामध्ये टेंडरसह प्रदूषणाच्या विषयावर चर्चा होणार होती. जि. प. निवडणुकीमध्ये झालेल्या राजकीय कारणावरून सुनील खराडे व धीरज डोंगळे यांच्यामध्ये वादास सुरुवात झाली. विरोधामध्ये काम करणार्या संजय नाधवडेकर नामक कर्मचार्याच्या बदलीवरून वाद वाढत गेला. यावरून मोठा गदारोळ झाला. याची माहिती मिळताच डोंगळे समर्थकांनी कारखान्यांवर धाव घेतली. त्यानंतर पुन्हा वातावरण तापले.
दोन तासाहून अधिक वेळ सुरू असणार्या गोंधळाची माहिती पंचक्रोशीमध्ये पसरली. त्यानंतर अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांच्यासह संचालकांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात यश आले नाही. यानंतर पत्रकारांशी बोलताना संचालक सुनील खराडे म्हणाले, कारखान्यामध्ये स्लिपबॉय असणारे संजय नाधवडेकर हे कौलव गावातील पाणीपुरवठा संस्थेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहेत. त्यांचे कारखान्यातील ठेकेदांराशी आर्थिक संबंध आहेत. त्यांची बदली केल्यावरून वादास सुरुवात झाली. कारखाना व पक्षविरोधी काम करणार्याला शिक्षा व्हावी, ही इच्छा आम्ही बोलून दाखविली. त्यावरून वादास सुरुवात झाली.
सुनील खराडे व धीरज डोंगळे हे सत्ताधारी स्व. पी. एन. पाटील गटाचेच कार्यकर्ते. परंतु खराडे यांनी राष्ट्रवादीमध्ये तर धीरज डोंगळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जि. प. निवडणूक लढविली होती. परंतु जि. प. निवडणुकीमध्ये खराडे यांनी डोंगळेंच्या विरोधात प्रचार केला, असा आरोप आहे. यातूनच ही वादावादी झाल्याची चर्चा आहे.
कारखान्याच्या दोन संचालकांमध्ये वादावादी झाल्याची बातमी बाहेर पसरताच दोघांच्याही समर्थकांनी कारखान्यावर गर्दी केली होती. काहीजणांनी कारखान्याच्या मिटिंग हॉलमध्ये जाण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रवेशाचा काचेचा मुख्य दरवाजा बंद होता. संतप्त कार्यकर्त्यांनी हा दरवाजाच्या काचा फोडल्यामुळे काचा आजूबाजूला पसरल्या होत्या. सुरक्षारक्षक व अन्य अधिकार्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अपुरा ठरला.