kolhapur | शाहू मिल जागेवर भव्य टेक्स्टाईल टुरिझम हब, स्मारक उभारणार

राज्य सरकारची तत्त्वतः मान्यता
मुंबई : मंत्रालयामध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत बोलताना वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आयुक्त के. मंजुलक्ष्मी आदी.
मुंबई : मंत्रालयामध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत बोलताना वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, आयुक्त के. मंजुलक्ष्मी आदी.
Published on
Updated on

कोल्हापूर : कोल्हापुरातील ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्याला साजेसे भव्य स्मारक आणि त्यांच्याच नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘टेक्स्टाईल टुरिझम हब’ (कापड पर्यटन केंद्र) उभारण्यास वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांनी तत्त्वतः मान्यता दिली. गुरुवारी (दि. 5) मंत्रालयात वस्त्रोद्योग महामंडळाच्या मालकीची शाहू मिलची जागा हस्तांतरासंदर्भात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

शाहू मिलची एकूण 26 एकर जागा दोन टप्प्यांत विकसित केली जाणार आहे. यामधील वस्त्रोद्योग विभागासाठीच्या 5 एकरांमध्ये ‘अर्बन हाट’ संकल्पना राबविली जाईल. याद्वारे कोल्हापुरी चप्पल, कोल्हापुरी साज आणि कापड या उद्योगांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल. तसेच, येथे प्रादेशिक कार्यालय स्थापन करून वस्त्रोद्योगवाढीस चालना दिली जाईल.

उर्वरित 21 एकर क्षेत्रातील जागेचा विकास आराखडा कोल्हापूर महानगरपालिकेने तयार करायचा असून, त्यासाठी प्रशासनाने निधी खर्च करावा, असे आदेश दिले आहेत. कोल्हापूरच्या औद्योगिक क्रांतीचे प्रतीक असलेल्या मिलमधील चिमणीला कोणताही धक्का न लावता तिचे मूळ स्वरूप जपून संवर्धन करण्याचाही आदेश देण्यात आला आहे. मिलमधील कामगार संघटनेच्या घरकुलासाठी दोन हजार चौरस मीटर जागा देण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर यांनी सुचविल्याप्रमाणे या प्रकल्पात खालील गोष्टींचा समावेश असण्याची शक्यता आहे. यामध्ये जुनी यंत्रसामग्री आणि कापड विणण्याच्या पद्धतींचे दर्शन, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेज, इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी आणि फॅबि—क डिझाईन संस्था, 1,000 ते 1,200 आसन क्षमतेचे भव्य ऑडिटोरियम आणि संगीत विद्यालय, कोटीतीर्थ तलावाच्या बाजूचे सुशोभीकरण करून अत्याधुनिक अ‍ॅम्युझमेंट पार्क आदींचा समावेश आहे.

या बैठकीस आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी अमोल येडगे (व्हीसीद्वारे) आणि वस्त्रोद्योग विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माजी कामगार संघटना आणि शाहू मिल पुनरुज्जीवन सर्वपक्षीय समितीने मिल सुरू करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा व आंदोलन केले आहे. त्यांच्या या लढ्यास यश मिळाले आहे. आमदार अमल महाडिक यांनी या जागेसंदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे सांगितले असून, मार्च महिन्यात पुन्हा एकदा आढावा बैठक घेतली जाणार आहे, असे सांगितले.

शाहू मिलने दिला साडेतीन हजार लोकांना रोजगार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1906 साली सुरू केलेल्या शाहू मिलमध्ये सुरुवातीपासून तीन ते साडेतीन हजार कामगार कार्यरत होते. कालांतराने वस्त्रोद्योग महामंडळाने नवीन तंत्रज्ञानाचा वापर न केल्याने हळूहळू उत्पादन कमी होऊ लागले. परिणामी, कामगारांची संख्याही घटू लागली. 2003 मध्ये शाहू मिल बंद करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाने 2003 साली 750 कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news