गुडाळ ; पुढारी वृत्तसेवा राधानगरी तालुक्याच्या पश्चिमेस दुर्गम भागात असलेल्या मानबेट पैकी धनगरवाडा येथील लहू बाबू गावडे या शेतकऱ्याची गाय बिबट्याने ठार केल्याची घटना (गुरुवार) मध्यरात्री घडली. आज शुक्रवारी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात बिबट्याचे ठसे आढळून आल्याने मानबेट परिसरात घबराट पसरली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, धामणी पाटबंधारे प्रकल्प आणि दाजीपूर अभयारण्याच्या सीमेवर मानबेटचा धनगरवाडा आहे. येथे गावडे कुटुंबीय राहतात. लहू गावडे यांनी बुधवारी गोठ्यात नवीन फरशी घातल्याने गोठ्यातील बैल जोडी आणि जनावरे घराच्या मागे बांधली होती. तर एक देशी गाय झाडाखाली बसली होती. मध्यरात्री बिबट्याने देशी गायीवर हल्ला करून तिला ठार केले. बिबट्या मागील बाजूने गाईचा फरशा पडत असतानाच गावडे कुटुंबियांना चाहूल लागली आणि त्यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी बिबट्या शेजारच्या जंगलाकडे पसार झाला.
सकाळी सामाजिक कार्यकर्ते विश्वास बुक्कम यांनी वन विभागाकडे वर्दी देताच वनपाल धनाजी पाटील आणि वनरक्षक सुनील हराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी बिबट्याचे ठसे आढळून आल्याने बिबट्याचा वावर स्पष्ट झाला.
दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासन नियमाप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात येईल अशी माहिती दाजीपूर वन्यजीव चे परिक्षेत्र वनाधिकारी अजित माळी यांनी दिली.
भीतीच्या छायेखाली असलेला मानबेटचा धनगर वाडा विजे अभावी कायमच अंधारात असून, जिल्हा नियोजन विकास मंडळाकडे निधी अभावी प्रलंबित असलेला विज पुरवठ्याचा प्रस्ताव प्रशासनाने त्वरित मंजूर करावा!
विश्वास बुक्कम
सामाजिक कार्यकर्ते, मानबेट