

वारणानगर / कोडोली : पन्हाळा तालुक्यातील केखले येथे गिरोली रस्त्यालगत म्हसोबा देवालयाच्या समोरील निकम-पाटील वस्तीवरील शेतात डुकराच्या शिकारीसाठी परिसरातीलच काही छुपे शिकारी सज्ज होते. डुक्कर येताच त्याचा पाठलाग करताना त्यातील एका शिकार्याने डुकरावर गोळी झाडली, पण डुक्कर गेले पळून आणि झाडलेली गोळी चक्क एका आंबे विकणार्या महिलेच्या जवळून गेली अन् तिच्या काळजाचा ठोका चुकला.
या शिकार्यांवर पाळत ठेवणार्या वन विभागाचे पथक क्षणात घटनास्थाळी दाखल झाले, पण शिकारी मात्र पळून गेले. दोन दिवस होऊनही अद्याप वन विभागाने कोणतीही कारवाई केली नाही. याबद्दल परिसरात उलटसुलट चर्चा असून यामध्ये पोलिस लक्ष घालणार का याकडे सर्वांचे वक्ष लागले आहे.
यावेळी तयारीनिशी आलेल्या वन विभागाने त्वरित शिकार्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आकाशात सोडला व चित्रीकरण केले. यावेळी उसाच्या शेतात दोन ते तीन शिकारी कॅमेर्यात चित्रीत झाले. त्यांचा पाठलाग केला, मात्र ते पळून जाण्यात यशस्वी झाले. या घटनेची परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे पन्हाळा वनविभागातील अधिकार्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, या शिकारीवेळी वाचलेल्या महिला आंबे विकत होती, पण बंदुकीतून झाडलेल्या गोळीचा आवाज अजूनही आपल्या कानात घुमत असल्याचे ती सांगत आहे.