कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक फैसला आज, पहिला कौल सकाळी दहापर्यंत | पुढारी

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक फैसला आज, पहिला कौल सकाळी दहापर्यंत

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर जिल्हा बँक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी आठ वाजल्यापासून रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉल येथे होत आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणीचा पहिला कौल समजणार आहे. बँकेच्या निवडणूक निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ग्रामीण भागात ईर्ष्येने पैजा रंगल्या आहेत.

महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणार्‍या जिल्हा बँक संचालकांच्या 21 जागांपैकी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आ. पी. एन. पाटील, आ. राजेश पाटील, माजी आ. अमल महाडिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांची निवड बिनविरोध झाली. संस्था गटातील सहा जागांसह 15 जागांसाठी 33 उमेदवारांचे भवितव्य बुधवारी झालेल्या मतदानानंतर मतपेटीत बंद झाले.

कोल्हापूर जिल्हा बँक : मोठा पोलिस बंदोबस्त

जिल्ह्यातील 13 ठिकाणी 40 केंद्रांवर 7 हजार 651 पैकी तब्बल 7 हजार 498 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. शाहूवाडी, गडहिंग्लज आणि भुदरगड तालुका संस्था गटात 100 टक्के मतदान झाले. प्रक्रिया गटात 448 पैकी 446, पतसंस्था गटात 1,221 पैकी 1,207, इतर संस्था गटात 4,115 पैकी 3,995 असे सरासरी 98 टक्के चुरशीने मतदान झाले. वाढलेला मताचा टक्का कोणाच्या पथ्यावर पडणार, याची उत्कंठा सर्वच घटकांना आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरात येणार्‍या वाहनांची कडक तपासणी करण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर गर्दी होणार नाही, याची दक्षता घेत, बॅरिकेडस् लावले आहेत.

दरम्यान, सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 40 टेबलवर मतमोजणी होणार आहे. यासाठी 10 अधिकारी आणि 160 कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. मतपत्रिकांच्या विभाजनानंतर साडेनऊ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीस सुरुवात होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांनी दिली.

पैजा रंगल्या

कार्यकर्त्यांमार्फत निकालाचे तर्क लढवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची स्पर्धा सुरू आहे. कोणती आघाडी आणि गटात बाजी मारणार, संभाव्य विजयी उमेदवारांचे आडाखे बांधत कार्यकर्त्यांकडून पैजा लावल्या जात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणार्‍या या निवडणुकीचा कौल असल्याने उत्कंठा ताणली आहे.

मंडलिक, आसुर्लेकर बाजी मारणार?

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील टोकाला पोहोचलेली ईर्ष्या पाहता आज काही गटांत धक्कादायक निकाल लागणार आहेत. सत्ताधारी आघाडीच्या विकास संस्था गटातील सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. सेवा संस्थांच्या जागेपेक्षा कृषी पणन व शेतीमाल प्रक्रिया गटाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

राजर्षी शाहू शेतकरी परिवर्तन विकास आघाडीकडून बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर व खा. संजय मंडलिक रिंगणात आहेत. आसुर्लेकर यांना आ. विनय कोरे यांनी थेट विरोध केला आहे. त्यामुळे ईर्ष्या अधिक टोकाला गेली. आसुर्लेकर यांना परिवर्तन पॅनेलमधून उमेदवारी देत सत्ताधार्‍यांना आव्हान दिले. आसुर्लेकर व मंडलिक या गटातून बाजी मारण्याची शक्यता आहे.

Back to top button