स्ट्राँग पासवर्ड, गोपनीय ओटीपीनेच फसवणूक थांबणार! | पुढारी

स्ट्राँग पासवर्ड, गोपनीय ओटीपीनेच फसवणूक थांबणार!

कोल्हापूर : गौरव डोंगरे

इंटरनेटवर पूर्णत: विसंबून असणार्‍यांकडूनच अनेकदा चुका घडत असतात. एक चूक दुरुस्त करण्यासाठी दुसरी चूक केल्याचे प्रकार अशावेळी घडतात. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी इंटरनेटवरच हेल्पलाईन क्रमांकाचा शोध घेतला जातो; पण खातरजमा न करता अशा क्रमांकावर सर्व माहिती देऊन फसगत झालेला व्यक्ती आणखीनच मोठ्या फसवणुकीत ढककली जाते. आपल्या ऑनलाईन बँकिंग, एटीएम, ई- मेल, सोशल मीडिया अकाऊंटचे पासवर्ड जितके स्ट्राँग तितकी फसवणुकीची शक्यता कमी असते.

स्क्रीन शेअरिंग टाळा

माहिती नसणारे अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घेणे धोक्याचे ठरू शकते. गेमिंगच्या फंदात अनेकदा अनोळखी अ‍ॅप डाऊनलोड केले जातात. अशातून तुमचा स्क्रीन अन्यत्र शेअर (मोबाईलचा ताबा दुसर्‍याकडे जाणे) होतो. याद्वारे तुमच्यापासून शेकडो किलोमीटर अंतरावर असणारा हॅकर तुमच्या मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरू शकतो.

तुम्हीच ठरता माहिती देणारे

कौटुंबिक सहल, पर्यटन, परदेशवारी याची माहिती अनेकदा व्हॉटस् अ‍ॅप स्टेटसवर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर दिली जाते. याचा फायदा चोरट्यांना होऊ शकतो. आपण स्वत:चा मोठेपणा दाखविण्यासाठी केलेली अशी कृती तुमच्याच तोट्याची ठरू शकते, याचेही भान ठेवले पाहिजे.

सायबर कॅफेमध्येही सावधानता बाळगा

सायबर कॅफेमध्ये आपली सोशल मीडिया अकाऊंटचे लॉगईन करणे टाळावे. आपल्या माहितीतील व खात्रीलायक नेट कॅफे/सायबर कॅफे असेल तरच तेथे आपली अकाऊंट सुरू करावीत; अन्यथा धोक्याने तुमची माहिती दुसर्‍याच्या हातात जाऊ शकते. (समाप्त)

ई-मेल पाठविताना स्पेलिंग तपासा

बक्षिसाचे आमिष दाखविणारे, खात्यावर पैसे जमा झाल्याचे, नोकरीविषयक येणार्‍या ई-मेलचे स्पेलिंग कटाक्षाने तपासणे गरजेचे आहे. नामांकित कंपन्या, व्यक्तींच्या नावाशी साधर्म्य साधून असे ई-मेल बनविल्यास अनेकजण फसवणुकीला बळी पडतात; पण त्या ई-मेलमधील सर्व अक्षरे तपासणे महत्त्वाचे आहे.

स्ट्राँग पासवर्ड

नेट बँकिंगसाठी, ई-मेलसाठी तसेच सर्व सोशल मीडिया खात्यांसाठी सहज-सोपा आणि एकच पासवर्ड ठेवण्याची चूक अनेकजण करतात. स्वत:ची जन्मतारीख, मोबाईल क्रमांक किंवा वाहनांचा क्रमांक याचा समावेश असतो; पण पासवर्ड हा सोपा ठेवण्याऐवजी इंग्रजी अक्षरे, अंक किंवा वेगवेगळी चिन्हे वापरल्यास तो अधिक स्ट्राँग बनतो. असे पासवर्ड स्वत:च्या मोबाईलमध्ये सेव्ह न करता डायरीमध्ये नोंदवून ते गोपनीय ठेवता येतील.

तत्काळ करा तक्रार

हनी ट्रॅपसारख्या घटनांमध्ये स्वत:ची समाजातील प्रतिमा जपण्यासाठी तक्रार देण्यात टाळाटाळ होते. परंतु, यामुळेच गुन्हेगारांना अधिक चालना व बळ मिळत असते. तक्रार दिल्यास आपली बदनामी होईल हा विचार तक्रारदाराने करता कामा नये. तत्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन घडलेला प्रकार सांगितल्यास पुढील धोका टाळता येतो. यामध्ये पोलिसांकडून तक्रारदाराचे नावही गोपनीय ठेवले जाते. तसेच बँकिंग फसवणूक, नोकरीविषयक फसवणूक, विवाह नोंदणीविषयी फसवणुकांसह कोणतीही सायबर क्राईमशी फसवणूक असल्यास https://cybercrime.gov.in केंद्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरही तक्रार नोंदवता येते.

Back to top button