

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा तब्बल सहा महिन्यानंतर विशाळगड आता पर्यटनासाठी खुला करण्यात आला आहे. प्रशासनाने यास तात्पुरती परवानगी दिली असली तरी पर्यटकांना नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. गडावर आज ९३ भाविक पर्यटकांनी पहिल्याच दिवशी हजेरी लावली असल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
पर्यटक, भाविकांना ३१ जानेवारीपर्यंतच सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विशाळगडावर आता जाता येणार आहे. प्रशासनाने गडावर जाण्यास पर्यटकांना परवानगी दिल्याने तब्बल सहा महिने ओस पडलेला विशाळगड काही अंशी आज गजबजला. पर्यटकांनी हजेरी लावल्याने गडवासीयांतून समाधान व्यक्त होत आहे. विशाळगडावरील हिंसाचारामुळे गड परिसरात पर्यटकांना प्रवेश बंद होता. परिणामी गडावरील सर्व व्यवहार ठप्प होते. स्थानिकांच्या रोजी रोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. सुमारे वीस हुन अधिक कुटुंबे स्थलांतरित झाली होती.
प्रशासनाने गडावर जाण्यासाठी नियम व अटी घातल्या आहेत. पर्यटकांनी तंतोतंत पालन करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना गडावर जाण्यास परवानगी देण्यात येत आहे. गडाच्या पायथ्याशी भाविक व पर्यटकांची तपासणी करण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये दि ८ ते १४ जानेवारीपर्यंत एक पथक सकाळी साडे नऊ ते सायंकाळी साडेपाचपर्यंत तपासणी करेल यामध्ये पथक प्रमुख निवासी नायब तहसीलदार गणेश लव्हे, मंडल अधिकारी शिवाजी पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी घनश्याम स्वामी, पोलीस अंमलदार संकपाळ, अन्न प्रशासन अधिकारी गणेश कदम, कॉन्स्टेबल मोहन पाटील, वनसेवक तानाजी भरणकर, योगेश भोसले आदींनी बुधवारी पर्यटक व भाविकांची तपासणी करून गडावर स्थानिक १३ व बाहेरील ९३ अशा १०६ लोकांना गडावर सोडल्याची दप्तरी नोंद झाल्याची माहिती तहसीलदार रामलिंग चव्हाण यांनी दिली.
प्रशासनने पर्यटकांसाठी गड खुला केला असला तरी पर्यटकांना नियम व अटी पाळाव्या लागणार आहेत. बुधवारी ९३ भाविक व पर्यटकांनी गडावर हजेरी लावली. मुक्काम करता येणार नसल्याने पर्यटकांनी पाचपूर्वीच गड सोडून माघारी आलेत. परिणामी गजबजलेल्या गडावर सायंकाळी शुकशुकाट होता.