

मिणचे खुर्द, पुढारी वृतसेवा
भुदरगड तालूक्यातील गिरगाव येथे जनावरांसाठी चारा आणण्यास गेलेल्या सुभाष दत्तात्रय देसाई (वय ४२) या शेतकऱ्यावर गव्याने हल्ला केला. यामध्ये ते गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये दाखल केले आहे. खासगी परिसरात गवे दाखल होण्याच्या घटना घडू लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
सुभाष देसाई आज सकाळी आपल्या गिरगाव येथील गट नं ८४ मध्ये गवत कापणीसाठी गेले होते. दरम्यान सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास विसावा घेत असलेल्या गव्याने शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. जखमी शेतकरी सुभाष देसाई यांना वैद्यकीय उपचारासाठी गारगोटी येथे आणल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना तातडीने कोल्हापूर येथील सीपीआरमध्ये हलवण्यात आले.
गवे मानवी वस्तीमध्ये दाखल होण्याच्या वारंवार घटना घडत असूनही वन विभाग यावर उपाययोजना करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. भुदरगड तालुक्यात तिसरी घटना घडूनही वन विभागाने कोणतीही उपाययोजना न केल्याने नागरिकांतून तीव्र भावना व्यक्त होत आहेत. घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल किशोर आहिर, वनपाल मारूती डवरी व वनसेवक बजरंग शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. सुभाष देसाई हे एका हताने अपंग असून त्यांची परस्थिती अंत्यत गरीबीची आहे त्यांनी मदत मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन वनक्षेत्रपाल किशोर आहिर यांनी दिले.
हेही वाचलं का?