

एकनाथ नाईक
कोल्हापूर : लहान मुलांचा कर्करोग हा साधारणतः 95 टक्के बरा होणारा आहे; परंतु कर्करोगाच्या जीवघेण्या आजाराची धास्ती, जनजागृतीचा अभाव, आर्थिक विवंचना यामुळे बालके या आजाराच्या विळख्यात आहेत. शासकीय रुग्णालयात कॅन्सर आजारावरील अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. लहान मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लिम्फोमा) मोठ्या प्रमाणात आढळत आहे. राज्यात 1 हजार बालकांची तपासणी केली असता यामध्ये 8 ते 9 रुग्ण रक्ताच्या कर्करोगाचे आढळून येत असल्याची माहिती कॅन्सरतज्ज्ञांनी दिली.
प्रौढांपेक्षा बालकांमधील रक्ताच्या कर्करोगामध्ये त्यांच्या पेशींचे स्वरूप व लक्षणे यात भिन्नता असते. प्रौढांमधील कर्करोगापेक्षा बालकांतील आजार झपाट्याने वाढतात. मात्र, बालके केमोथेरपीला चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. वेळीच निदान झाल्यास लहान मुलांमधील या कर्करोगाचे सूमळ उच्चाटन होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मुलांमधील कर्करोगावर उपचार करताना रुग्णालयामध्ये आता इम्युनथेरीपीचा वापर प्रभावीपणे होत आहे. पहिल्या पाच वर्षांमध्ये कर्करोग पुन्हा उद्भवला नाही, तर बालक कॅन्सरमुक्त झाल्याचे वैद्यकीय निदान करण्यात येते. सर्व कर्करोगांपैकी ‘रक्ताचा कर्करोग’ हा 30 टक्के आहे. मेंदू, पाठीच्या कण्यामध्ये उद्भवणारे ट्यूमर, बालपणातील कर्करोगापैकी सुमारे 25 टक्के असल्याची कॅन्सरतज्ज्ञांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.
रक्ताच्या कर्करोगाचे रुग्ण...
मुलांमध्ये ताप येणे, वजन कमी होणे, रक्त कमी होणे, शरीरात गाठी, लाल डाग येणे, पोट फुगणे अशी लक्षणे आढळल्यास बालरोगतज्ज्ञांशी संपर्क साधावा. लहान मुलांमध्ये रक्ताचा कर्करोग (ल्युकेमिया आणि लिम्फोमा) सर्वात जास्त प्रमाणात आढळतो. या व्यतिरिक्त मेंदू, मूत्रपिंड, यकृत आणि हाडे इत्यादी अवयवांनाही कर्करोग होऊ शकतो.
जागरूकतेचा अभाव
उशिरा निदान, अपुरे उपचार, मोठा खर्च व अर्धवट उपचारांनी अकाली दगावणार्या बाल कर्करोग रुग्णांची संख्या मोठी आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने मुंबई, पुणे, नागपूर येथे कॅनकिडस् संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. ‘सीपीआर’मध्ये कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे पथक रुग्णांवर उपचार करत आहे.