

कोल्हापूर : अल्फोन्सा स्कूलची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी अपेक्षा कांडर हिने शालेय अभ्यासक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान तिने सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये येण्याची प्रेरणा तुम्हाला कोठून मिळाली? असा प्रश्न विचारला. त्यावर जिल्हाधिकार्यांनी सोप्या भाषेत उत्तरे देत विद्यार्थ्यांनी अधिक वाचन करावे, शिस्त व संयम पाळावा, मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा आणि समाजाकडे जबाबदारीने पाहावे, असे मार्गदर्शन केले.
अपेक्षा हिने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून मुलाखतीची विनंती केली होती. विद्यार्थिनीची जिज्ञासा लक्षात घेऊन येडगे यांनी तत्काळ मान्यता दिली. ही मुलाखत इंग्रजी भाषेत पार पडली. यावेळी सेवेमधील आव्हाने, ती कशी पेलली जातात, विद्यार्थ्यांकडून असलेल्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांसाठीचा सल्ला, असे प्रश्नही तिने विचारले. मुलाखतीनंतर अपेक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मानवतावाद हे पुस्तक जिल्हाधिकारी येडगे यांना भेट दिले. या उपक्रमासाठी माजी कस्टम अधिकारी मदन पवार यांचे मार्गदर्शन लाभले.