कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या संचालकपदी आमदार पी. एन. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यापाठोपाठ काँग्रेस आमदार पी. एन. पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेकडून दादासाहेब लाड यांनी हा अर्ज माघार घेतल्याने आमदार पाटील यांची बिनविरोध निवड झाली. (MLA P N Patil)
आमदार पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरताना शक्तिप्रदर्शन करत २५१ पैकी २३५ अर्जदारांना एकत्र केले होते. दरम्यान शिवसेना जिल्हा बँकेसाठी स्वतंत्र पॅनेल उभारत आहे. यामध्ये शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब लाड यांनी अचानक अर्ज माघार घेतल्याने पी. एन. पाटील यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ओबीसी, पतसंस्था आणि बँका, प्रक्रिया, महिला, दूध संस्था व अनुसूचित जाती-जमाती या सहा गटांतील उमेदवारांची घोषणा सत्ताधारी आघाडीने सोमवारी केली. दरम्यान, दिवसभरात सहा तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर वाटाघाटी फिस्कटल्याने दोन जागांसह स्वीकृतचा प्रस्ताव शिवसेनेने अमान्य करत, स्वतंत्र पॅनेल करण्याची घोषणा केली. मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असून, चर्चेतून मार्ग न निघाल्यास सत्ताधारी उर्वरित तीन जागा तसेच शिवसेना संपूर्ण 19 उमेदवारांची घोषणा करणार आहे.
जिल्हा बँकेच्या 21 संचालक पदांसाठी 5 जानेवारीला मतदान होत आहे. अर्ज माघारीला शेवटचा दिवस बाकी असताना शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांची बैठक झाली. गगनबावडा आणि कागल तालुका संस्था गटातून पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह आमदार पी. एन. पाटील हे बिनविरोध झाले आहेत.
उर्वरित जागांवर ताकदीनुसार जो-तो लढणार असल्याचे यापूर्वीच ठरले आहे. उर्वरित नऊ गटांतील जागावाटपाचा तिढा कायम होता. शिवसेनेला प्रक्रिया गटातून खा. संजय मंडलिक आणि महिला गटातून माजी खासदार निवेदिता माने या दोन जागा सत्ताधारी आघाडीने देऊ केल्या आहेत.
शिवसेनेने अजून तिसर्या जागेची मागणी केल्यानंतर स्वीकृत संचालक देण्याचा प्रस्ताव सत्ताधारी आघाडीने दिला. शासकीय विश्रामगृह येथे तब्बल सहा तास चर्चेच्या फेर्या होऊनही वाटाघाटी फिस्कटल्या. रात्री नऊ वाजता शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसेना स्वतंत्र लढणार असल्याचे जाहीर केले. मंगळवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत अजून तिसरी जागा द्यावी; अन्यथा पॅनेलची घोषणा केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.