गवा : वडणगे परिसरात पुन्हा २ गव्यांवा वावर, कोल्‍हापूर-वडणगे मार्ग वाहतुकीसाठी बंद | पुढारी

गवा : वडणगे परिसरात पुन्हा २ गव्यांवा वावर, कोल्‍हापूर-वडणगे मार्ग वाहतुकीसाठी बंद

वडणगे; पुढारी वृत्तसेवा

वडणगे (ता. करवीर) येथील झाडवाट गवताच्या कुरणात आज (गुरूवार) सकाळी एक लहान वयाचा गवा चरताना लोकांना दृष्टीस पडला. तर दुसरीकडे पाणंद येथे एका मोठ्या गव्याचा वावर आढळला. कोल्हापूर, वडणगे परिसरात रोज वेगळ्या ठिकाणी गव्यांचा वावर आढळून येत असल्याने, गव्यांचा एक मोठा कळप कोल्हापूर परिसरात भरकटलेला असावा अशी भीती व्यक्त होत आहे.

आज सकाळी वडणगे कोल्हापूर (पोवार पाणंद) मार्गाला लागून असलेल्या झाडवाट कुरणात एक गवा चरत असताना आढळला. तर कोल्हापूर कसबा बावडा मार्गावरील पाणंद येथेही एक पुर्ण वाढ झालेला गवा लोकांच्या दृष्टीस पडला. पोवार पानंद मार्गावरून जाणाऱ्या काही तरुणांनी याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर वडणगे परिसरात पुन्हा गवे आल्याची बातमी वार्‍यासारखी पसरली.

वडणगे पोवार पाणंद मार्गावरून जाणाऱ्या लोकांनी गवा पाहण्यासाठी गर्दी केली. येथे पुन्हा गवे आल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी व पोलिसांनी येथे येऊन लोकांची गर्दी पांगवली. वडणगे- कोल्हापूर (पोवार पाणंद) मार्ग वाहतुकीसाठी त्वरित बंद केला आहे. गव्याच्या हल्ल्यात भुयेवाडी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याने नागरिकांना शांत आणि सतर्क राहण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

पहा व्हिडिओ : कोल्हापूरच्या रस्त्यांवरून गव्याची भटकंती सुरूच

Back to top button