

कोल्हापूर : महापालिकेच्या न केलेल्या कामाचे तब्बल 85 लाखांचे बिल अदा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. या घोटाळ्यातील तिन्ही अभियंत्यांनी बिले मंजूर करताना आमच्या सह्या वापरल्या गेल्याचे नाकारले असून, ‘त्या’ बोगस सह्या ठेकेदारानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महापालिकेचे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ड्रेनेज कामातील गैरव्यवहार उघड केला. त्यात, कोणतीही कामे न करता 85 लाख रुपये अदा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणानंतर फक्त दोन तासांत संबंधित ठेकेदारानेच ‘सह्या बनावट आहेत,’ अशी कबुली महापालिकेत दिली, अशी माहिती समोर आली आहे.
याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी तत्काळ हालचाली करत तत्कालीन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता रमेश कांबळे आणि कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड यांच्याकडे लेखी स्पष्टीकरण मागवले. त्यांनी दिलेल्या खुलाशात स्पष्टपणे नमूद केले की, ‘या बिलांवरील सह्या आमच्या नाहीतच’, अशाप्रकारे त्यांनी आपली जबाबदारी नाकारली आहे.
सध्या महापालिकेच्या प्रशासक के. मंजुलक्ष्मी या प्रशिक्षणासाठी परगावी असून, गुरुवारी त्या कामावर हजर होणार आहेत. त्यानंतर या प्रकरणाची सर्व माहिती आणि खुलासे त्यांच्यासमोर सादर करण्यात येणार असून, कारवाईला गती मिळण्याची शक्यता आहे. या घोटाळ्यामुळे महापालिकेतील बिल मंजुरी प्रक्रिया, सुरक्षितता आणि जबाबदारी यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, संबंधित अधिकार्यांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोल्हापूर : काम न करताच महापालिकेने अदा केलेल्या 85 लाखांच्या प्रकरणाचा शोध विविध प्रकारे घेतला जात आहे. मंगळवारी याप्रकरणी तिघा अभियंत्यांना नोटिसा दिल्यानंतर बुधवारी सायंकाळनंतर महापालिकेच्या लेखा विभाग आणि चिफ ऑडिट विभागाकडून स्पष्टीकरण मागितले आहे. खातरजमा न करताच बिले कशी अदा झाली. याबाबत या विभागातील अधिकारी आणि कर्मचार्यांकडेही विचारणा सुरू आहे. 85 लाखांच्या बिल अदा करण्याच्या प्रकरणाला वेगवेगळे वळण लागत आहे. अभियंत्यांनी ‘त्या’ सह्या आमच्या नव्हेच, असे स्पष्टीकरण दिल्यानंतर आता चिफ ऑडिट विभाग आणि लेखा विभागाकडेही स्पष्टीकरण मागितले आहे. या विभागाचे अधिकारी आता काय स्पष्टीकरण देतात आणि त्यांच्याकडून कोणती माहिती उघड होते, याबद्दलही आता उत्सुकता निर्माण झाली आहे.