83 kg ganja seized
83 kg ganja seized | कोल्हापुरात 83 किलो गांजा जप्तfile photo

83 kg ganja seized | कोल्हापुरात 83 किलो गांजा जप्त

एकास अटक; 25 लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील राजाराम तलाव परिसरात कारवाई करून पोलिसांनी तब्बल 83 किलो गांजा जप्त केला. याप्रकरणी समीर पापा शेख (वय 34, रा. साईनगर, कात्रज, पुणे) याला अटक केली. त्याच्याकडून 20 लाख रुपयांच्या गांजासह 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राजारामपुरीचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सापळा लावून ही कारवाई केली.

टेम्पोत नायलॉनच्या पिशव्यात गांजा...

पोलिस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना राजाराम तलाव गेटसमोर सरनोबतवाडी ते शिवाजी विद्यापीठ रोडवर एक व्यक्ती गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार 27 जानेवारी रोजी मध्यरात्री 12 च्या सुमारास सापळा लावला होता. शेख टेम्पो घेऊन तेथून जाताना पोलिसांनी अडवून झडती घेतली. त्यात वेगवेगळ्या रंगांतील नायलॉनच्या पिशव्या आढळल्या. पोलिसांना संशय आल्याने त्या पिशव्या उघडून पाहिल्या.

विक्रीसाठी आणला होता गांजा...

प्रत्येक पिशवीत 10 पॅकेट चिकटपट्टीमध्ये गुंडाळलेली असे गांजाचे एकूण 40 पॅकेट आढळले. 83 किलो 145 ग्रॅम इतका गांजा असून त्याची किंमत 20 लाख 78 हजार 625 रुपये आहे. तसेच 5 लाखांचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला. शेख याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवस पोलिस कोठडी दिली. हेड कॉन्स्टेबल अमोल पाटील, कृष्णात पाटील, कॉन्स्टेबल संदीप सावंत, सत्यजित सावंत, सुशांत तळप, अमोल पाटील आदी कारवाईत सहभागी होते.

संबंधित मालकाचा फोन बंद

टेम्पोचालकास ज्याने गांजाच्या पिशव्या दिल्या त्याचा मोबाईल क्रमांक पोलिसांनी मिळाला आहे. त्या क्रमांकवर संपर्क साधला असता तो बंद असल्याचे समोर आले. या मोबाईल क्रमांकावरून संबंधित मालकाचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.

कर्नाटकात जात होत गांजा...

शेख याचा ट्रान्स्पोर्टचा व्यवसाय आहे. पिशव्यांत कोकोपीठ भरले असून ते कर्नाटकात पोहोचवायचे आहे, असे सांगण्यात आले होते. त्यानुसार शेख याने भाडे घेतल्याचे पोलिसांना सांगितले. नायलॉनच्या पिशव्या असल्याने आपल्याला त्याची कोणतीच माहिती नाही, असेही त्याने पोलिसांना सांगितले. दरम्यान, पुण्यातून हा गांजा कर्नाटकात विक्रीसाठी नेला जात होता, असे पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.

रॅकेट शोधण्याचे आव्हान; पथक लवकरच पुण्यात

राजारामपुरी पोलिसांनी पकडलेल्या गांजाचे पुणे कनेक्शन उघड झाले आहे. गांजा वाहतूक करणारा टेम्पोचालक केवळ वाहतुकीपुरताच मर्यादित आहे. त्यामुळे चालकाकडून संबंधित गांजा मालकाचा मिळालेल्या नंबरवरून गांजाचे रॅकेट शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. पोलिसांचे पथक लवकरच पुण्याला रवाना होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news