महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील 80 कैद्यांना कळंबा जेलमध्ये हलविले

60 पुरुष व 20 महिला कैद्यांचा समावेश
80 prisoners from Sangli district were shifted to Kalamba Jail in the wake of floods
सांगली जिल्ह्यातील 80 कैद्यांना कळंबा जेलमध्ये हलविले.Pudhari File Photo

कोल्हापूर : महापुराच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा कारागृहातील 80 कैद्यांना सुरक्षिततेच्या कारणामुळे शुक्रवारी सकाळी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात हलविण्यात आले आहे. त्यामध्ये 60 पुरुष व 20 महिला कैद्यांचा समावेश आहे. अन्य जिल्ह्यातीलही कैद्यांनाही येत्या दोन- तीन दिवसांत ‘कळंबा’मध्ये स्थलांतरित करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

खुनासह गांजा, मोबाईल व जीवघेणी हल्लाप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल झालेल्या व कळंबा कारागृहात बंदिस्त असलेल्या 25 कैद्यांना अकोला, नागपूर, अमरावती, यवतमाळ कारागृहात हलविण्यात आले आहे, अशी माहिती कळंबा कारागृहाचे अधीक्षक विवेक झेंडे यांनी दिली. सांगली, मिरजेसह जिल्ह्यात महापुराची स्थिती गंभीर होत आहे. पाण्याची पातळी वाढू लागल्याने शहरातील मध्यवर्ती राजवाडा चौक, कापडपेठ, रिसाला रोड, खणभाग, स्टेशन चौकात पाण्याचा शिरकाव होण्याची शक्यता आहे. राजवाडा चौक, गणेशदुर्गपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहाला महापुराच्या पाण्याचा धोका असल्याने कारागृहातील कैद्यांना अन्य जिल्ह्यांतील कारागृहात सुरक्षास्थळी हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात 80 कैद्यांना आज सकाळी कळंबा कारागृहात हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 60 पुरुष आणि 20 महिला कैद्यांना बंदोबस्तात येथे आणण्यात आले. कळंबा कारागृहात 1699 अशी क्षमता असताना सद्या 2 हजार 118 कैदी बंदिस्त आहेत. त्यामध्ये 100 महिला कैद्यांचा समावेश आहे.

25 कैदी अकोला, अमरावती, नागपूरला स्थलांतरित

कळंबा जेलमधील गांजा पुरवठा, मोबाईलचा वापर, मुंबईतील कैद्याचा खून तसेच हल्ल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेल्या 25 कैद्यांना अकोला, नागपूर, यवतमाळ येथील कारागृहात हलविण्यात आल्याचे कारागृह अधीक्षक विवेक झेंडे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news