कोल्हापूर ः राजेंद्र जोशी : लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्याला प्रारंभ होत आहे. या निवडणुकीच्या टप्प्यामध्ये निवडणूक लढविणारे सुमारे 29 टक्के उमेदवार कोट्यधीश असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये सर्वाधिक 77 उमेदवार भारतीय जनता पक्षाचे, तर 60 उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये कोल्हापूरचे शाहू महाराज यांनी आपली संपत्ती 342 कोटी रुपये असल्याचे अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दिले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार्या पल्लवी श्रीनिवास धेंपे या टप्प्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांची मालमत्ता 1 हजार 361 कोटी रुपये इतकी असून गुणा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपल्या विवरण पत्रामध्ये 424 कोटी रुपये मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यामध्ये 12 राज्यांतील 95 जागांवर निवडणूक होत आहे. या निवडणुकीत 1 हजार 352 उमेदवार सहभागी झाले आहेत. शाहू महाराज हे काँग्रेसच्या यादीतील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार समजले जातात.
लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात दाखल झालेल्या एकूण विवरण पत्रांपैकी 244 म्हणजेच 18 टक्के उमेदवारांच्या नावावर फौजदारी गुन्हे आहेत; तर 392 उमेदवारांच्या म्हणजेच 29 टक्के उमेदवारांची मालमत्ता एक कोटी वा त्याहून अधिक आहे. या कोट्यधीश उमेदवारांची संख्या आणि एकत्रित मालमत्ता याचा विचार करता प्रत्येकाकडे सरासरी 5 कोटी 66 लाख रुपयांची मालमत्ता आहे.
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्मस् (एडीआर) या संस्थेच्या वतीने तिसर्या टप्प्यातील उमेदवारांच्या मालमत्ता, त्यांच्या नावावर असलेले गुन्हे यांचे विश्लेषण करण्यात आले आहे. ज्या मतदारसंघामध्ये तीन किंवा त्याहून अधिक उमेदवारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असतील, अशा मतदारसंघांना 'रेड अलर्ट' म्हणून ओळखले जाते. तिसर्या टप्प्यामध्ये एकूण 95 मतदारसंघांपैकी 43 मतदारसंघांवर हा 'रेड अलर्ट'चा शिक्का आहे आणि निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण उमेदवारांत 1 हजार 352 उमेदवारांपैकी 123 म्हणजे 9 टक्के महिलांचा समावेश आहे.
दक्षिण गोव्यातून भाजपच्या पल्लवी धेंपे
1361 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह आघाडीवर
गुणा मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्योतिरादित्य सिंधियांची मालमत्ता 424 कोटी
लोकसभा निडणुकीच्या तिसर्या टप्प्यात 29 टक्के उमेदवार कोट्यधीश!
निवडणुकीच्या रिंगणात अवघ्या 321 महिला
244 उमेदवारांवर फौजदारी गुन्हे