

कोल्हापूर : यंदाच्या ऊस गाळप हंगामाला राज्यात सुरुवात होऊन एक महिना झाला तरी अजून ७८ साखर कारखान्यांची धुराडी पेटलेली नाहीत. दुष्काळामुळे पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध नसल्याने आणि आर्थिकदृष्ट्या आजारी असल्याने बंद साखर कारखान्यांतील अनेक कारखाने यंदा सुरू होतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, कोल्हापूर, सोलापूर, पुणे आदी ऊस पट्ट्यातील साखर कारखान्यांच्या गाळपास वेग आला आहे.
१२ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील एकूण २२४ साखर कारखान्यांपैकी १४६ कारखाने सुरू झाले आहेत. यामध्ये ७२ सहकारी, तर ७४ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. शासनाने १५ ऑक्टोबरला हंगाम सुरू करण्याचा आदेश कारखान्यांना दिला. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात दरासाठी शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू होते. आता आंदोलन संपल्याने पुणे, सोलापूर, नांदेड विभागासह ऊस पट्ट्यातील कारखान्यांच्या गाळपास वेग आला आहे; पण नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर या भागातील बहुतांशी कारखाने बंद आहेत. यामुळे अजूनही ७८ कारखान्यांचे गाळप सुरू झालेले नाही.
सरासरी उतारा ८.३६, कोल्हापूर भागात साडेनऊवर
राज्यात आतापर्यंत एकूण १ कोटी ८८ लाख ३५ हजार ५२२ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. त्यातून १ कोटी ६० लाख ७८ हजार १०६ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.३६ टक्के आहे. कोल्हापूर विभागात सर्वाधिक ९.६ साखर उतारा आहे.
ऊस पट्ट्यातील कारखान्यांच्या गाळपाला वेग आला आहे. दुसऱ्या बाजूला, अनेक कारखान्यांचा हंगाम दुष्काळामुळे उसाची टंचाई आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने यंदा सुरू होण्याची शक्यता कमी आहे.
विजय औताडे, साखर उद्योगातील अभ्यासक, कोल्हापूर