कोल्हापूर: विशाळगडावर बिबट्याकडून गायीचा फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण | पुढारी

कोल्हापूर: विशाळगडावर बिबट्याकडून गायीचा फडशा; नागरिकांत भीतीचे वातावरण

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा:  भक्ष्याच्या शोधात असलेल्या बिबट्याने विशाळगडावरील भोसलेवाडी येथील भरवस्तीतील जुन्या शिवकालीन मार्गानजीक गायीचा फडशा पाडला. ही घटना नुकतीच घडली. वनविभागाच्या वतीने नेमका बिबट्याने हल्ला की अन्य वन्य प्राण्याने केला, याचा शोध मोहीम करण्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्या कैद झाल्याने गडावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी विशाळगड ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, विशाळगडावर बिबट्याचा वावर असल्याची चर्चा बऱ्याच दिवसांपासून ग्रामस्थांत होती. गडावरील भोसलेवाडी परिसरात मलिक रेहान दर्ग्याच्या पाठीमागच्या बाजूस शिवकालीन जुना मार्ग आहे. या मार्गावर झाडाझुडुपांचे साम्राज्य आहे. या परिसरात गंगाराम भोसले यांच्या गायीचा वन्यप्राण्याने फडशा पाडल्याने ती अर्धवट शरीर निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही बाब वनविभागाला कळविली असता बिबट्याच्या शोध मोहिमेसाठी वनविभागाच्या वतीने अर्धवट शरीर पडलेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावला. ट्रॅप कॅमेऱ्यात रात्री साडेनऊ वाजता अर्धवट गायीचे शरीर बिबट्या ओढून नेत असल्याचे दिसून आले आहे. गंगाराम रामचंद्र भोसले यांच्या मालकीची ही गाय आहे.

ट्रॅप कॅमेऱ्यात बिबट्याची पूर्ण वाढ झाली असल्याची दिसून येत आहे. या घटनेने भोसलेवाडीसह विशाळगड वासीय भीतीच्या छायेत आहेत. वनविभागाचे वनरक्षक संगम खूपसे, पोलीस पाटील उदय जंगम, साहिल अंजुम गोलंदाज, दस्तगीर करीम मुजावर यांनी या घटनेचा पंचनामा केला. वनविभागाने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावा, नुकसानग्रस्त पशुपालकांस नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी गडवासीयांतून होत आहे.

वर्षभरात बिबट्याकडून अनेक पाळीव प्राणी फस्त

यापूर्वी सप्टेंबर महिन्यात येथील रियाज गफ्फुर बारगीर यांच्या गायीच्या वासराचा, जानेवारी महिन्यात रियाज बारगीर यांचा रेडा बिबट्याने फस्त केला होता. तर गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर पैकी वाणीपेठ, मुसलमानवाडी, दिवाणबाग, बौद्धवाडी या परिसरातही बिबट्याच्या हल्ल्यात वर्षभरात सात गायीं, एक  गाढव आणि रेडकू बिबट्याने फस्त केले आहेत. तो आता भरवस्तीत घुसू लागल्याचे चित्र आहे.

हेही वाचा

 

Back to top button